Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

साठवण तलाव कोरडा पडल्याने पुणतांबेकरांवर पाणीटंचाईचे सावट

Share

गोदावरीला दुथडी भरून पाणी; पाटबंधारे खात्याचा सावळा गोंधळ

पुणतांबा (वार्ताहर) – गावाला पाणीपुरवठा करणार्‍या सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या तलावात अवघे दोन दिवस पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध असल्यामुळे तसेच पूरक पाणीपुरवठा योजनेअंर्तगत गोदावरी नदीवर असलेली पर्यायी पूरक पाणीपुरवठा योजना गोदावरी नदीला पूर आल्यापासून बंद झाली आहे. त्यामुळे भर पावसाळ्यात पुणतांबेकरांना पिण्याच्या पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

पुणतांबा गावासाठी असलेल्या साठवण तलावातील पाण्याचा साठा संपत आला असून पिण्याच्या पाण्यासाठी तातडीने गोदावरी उजव्या कालव्यास पाणी सोडून सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेचा तलाव पाण्याने भरून द्यावा, अशी लेखी मागणी ग्रामपंचायतीने पाटबंधारे खात्यास केल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी सोमनाथ पटाईत व पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख लक्ष्मण वढणे यांनी दिली आहे. गोदावरी उजवा कालवा सध्या राहाता व परिसरात वाहत आहे. पाटबंधारे खात्याने तातडीने दोन दिवसात पिण्यासाठी पाणी सोडले तरच पुणतांबेकरांना पाण्याची टंचाई भासणार नाही. मात्र सात नंबरवर पाणी द्यावयाचे की बंधारे, गावतळी पाण्याने भरून द्यावयाचे की पिण्याच्या पाण्यासाठी प्राधान्याने खाली पाणी सोडावयाचे याबाबत पाटबंधारे खात्याच्या राहाता कार्यालयालयातील अधिकार्‍यात संभ्रम असल्यामुळे तसेच त्यांच्या सावळा गोंधळामुळे पुणतांबा गावाला पिण्यासाठी लगेचच पाणी सुटेल अशी शक्यता वाटत नाही. त्यामुळे पाणीटंचाईचे सावट जाणवत आहे.

गोदावरी नदी दीड महिन्यापासून दुथडी भरून वाहत आहे. मात्र गोदावरी उजव्या कालव्याच्या चारी नंबर 18, 19 ला कालव्याचे पाणी पुरेसे न सोडल्यामुळे तसेच अपुर्‍या पावसामुळे परिसरात अगोदरच पाणीटंचाई आहे. गणेश बंधारे, गावतळी अद्यापही कोरडे आहेत. विहिरींच्या पाण्याच्या पातळीत किंचितही वाढ झालेली नाही.

वारंवार मागणी तसेच आंदोलने करून पाटबंधारे खात्याने बंधार्‍यात पाणी सोडले नाही. त्यामुळे शेतकरी वर्गात तीव्र नाराजी आहे. त्यामुळे पिण्यासाठी तलावात केव्हा पाणी सोडले जाईल याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे. विशेष म्हणजे 11 मे 2018 रोजी सरपंचपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर डॉ. धनंजय धनवटे यांनी अत्यंत चांगले नियोजन करून गावाला पाणीटंचाई जाणवू दिली नाही. त्यामुळे सद्य परिस्थितीत ते पाणीटंचाईवर कसा मार्ग काढतात याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

 

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!