प्रदूषणमुक्त दिवाळीला एसपींचा ‘सुरूंग’ : फटाके खरेदीची केली सक्ती

0

पोलीस अधीक्षकांचा अजब फतवा 

अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यशासन प्रदुषणमुक्त दिवाळीसाठी जनजागृती करत असताना दुसरीकडे अहमदनगरचे एसपी रंजनकुमार शर्मा यांनी शासनाच्या या उपक्रमाला हरताळ फासला आहे.
दिवाळीसाठी पोलिसांना एक हजार रुपयांचे फटाके खरेदी करण्याच्या सक्तीचा अजब फतवाच त्यांनी काढला आहे. इतकेच नव्हे तालुका पोलीस ठाण्यात फटाके विक्रीचे स्टॉलही लावले जाणार आहेत.
जिल्ह्यातील तीन हजार पोलिसांना सक्तीने प्रत्येकी हजार रुपयांचे फटाके विकले जाणार आहे. त्यांच्या पगारातून फटाक्याचे पैसे परस्पर कपात केले जाणार आहे. त्यासाठी पोलीस दलातील वेलफेअर विभागावर खास जबाबदारी देण्यात आली आहे.
फटाके खरेदी करावेत यासाठी ‘स्वस्ताई’ची आवई उठविण्यात आली आहे. पोलिसांच्या घरात दु:खद प्रसंग घडला असेल किंवा वैयक्तिक कारणामुळे अनेक पोलीस घरात दिवाली साजरी करत नाहीत. आता त्या पोलिसांनाही एसपींच्या आदेशामुळे बळजबरीने दिवाळी साजरी करण्याची वेळ आली आहे.
पोलिसांना विक्री करण्यात येणारे फटाके थेट नागपूरहून उमसान एन्टरप्राईजेस या कंपनीकडून मागविण्यात आली आहेत. फटाके खरेदी सक्तीच्या अट्टाहास नेमका कशासाठी याचे कोडे मात्र जिल्हा पोलीस दलातील प्रत्येकाला पडले आहे. मात्र खुलेअमा बोलण्यास कोणी धजावत नाही.
पोलीस दलात प्रत्येक समाजातील कर्मचारी आहे. समाजाचे रितीरिवाज दूर ठेवून त्यांनाही फटाके विकत घेण्यासाठी हजार रुपये खर्च करावे लागणार आहे. सा मागे नेमके गौडबंगाल का? असा प्रश्न उपस्थितीत केला जात आहे.
प्रत्येक बंदोबस्तावेळी पोलिसदादावर तणाव येतो.
त्यांना तणावातून बाहेर काढणे तसेच स्वस्तात फटाके उपलब्ध व्हावेत, यासाठी पोलीस अधीक्षकांनी हा फतवा काढल्याची सारवासारव काही अधिकारी करत आहेत.  ज्यांना फटाके खरेदी करायचे ते पोलीस आपल्या ऐपतीनुसार खरेदी करतील. त्यांना एक हजार रुपयांचे फटाके घ्या ही सक्ती कशासाठी असा प्रश्‍न उपस्थित केला जाऊ लागला आहे.

फटाके विक्रीची यंत्रणा राबविण्यासाठी पोलीस मुख्यालयातील चार हवालदार व त्यांना मदतनीस म्हणून चार कर्मचारी यांच्या नेमणुका करत असल्याचा फतवाही एसपी शर्मा यांनी जारी केला आहे. आता एसपींचा फतवा म्हटल्याने त्याला अडविणार कोणं असं म्हणत पोलिस दल तोंड दाबून बुक्क्यांचा मारा सहन करत असल्याची चर्चा सुरू आहे.

एसपी साहेब… पारदर्शकतेचं तेवढं बघा!
पोलीस वेलफेअरसाठी प्रत्येक पोलीस कर्मचार्‍यांच्या पगारातून ठराविक रक्कम दर तिमाही कपात केली जाते. वेलफेअर फंडात जमा झालेल्या गंगाजळीचा हिशेब अनेकांना माहिती नसतो. पोलीस अधिकार्‍यांची बैठक असली की त्यांच्या जेवणावळीचा खर्च त्यातून केला जातो. म्हणजे कर्मचार्‍यांच्या पैशातून अधिकार्‍यांची एैश असे म्हणावे लागेल. वेलफेअर फंडात पैसा जमा व्हावा यासाठी वर्षातून दोन वेळेस सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन त्यातूनही पैसे उभारले जातात. पण त्याच्या हिशेबात मात्र पारदर्शकता नसते. एसपी शर्मा साहेबांनी हिशेबात पारदर्शकता आणली तर बरं होईल असंही पोलीस दलात बोललं जात आहे. 

या ठिकाणी पोलीस विकणार फटाके – 
पोलीस कर्मचार्‍यांना जसे अल्प दरात सक्तीचे फटके करण्यात आले आहे. त्याच दरात नागरिकांना देखील फटाके उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यासाठी श्रीरामपुर, संगमनेर, अकोले, नेवासा, कोपरगाव, नगर शहर, अशा विविध ठिकाणी फटाके स्टॉल उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी पोलीस कर्मचार्‍यांच्या नेमणुका करण्यात येणार आहे. काही पोलीस ठाण्यात फटके पोहच झाले असून बाकी ठिकाणी फटके उपलब्ध करुन देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे पोलीस आता कायदा व सुव्यवस्था राखण्याऐवजी भांडवल उभे करण्याचे काम करणार का? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.

समस्या असल्यास वरिष्ठांशी संपर्क साधावा – 
पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने चांगल्या हेतूने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. पोलीस हा वर्दीत असतांना तो फक्त पोलीस असतो. त्यामुळे फटाके देतांना भेदभाव न करता कोणताही दुजाभाव करण्यात आलेला नाही. सर्व कर्मचार्‍यांना फटके घेण्याचे आदेश आहेत. जर कोणाच्या समस्या असतील त्यांच्यावर तोडगा काढण्यात येईल. त्यांनी वरिष्ठांशी सपर्क साधावा.
– नारायण वाखारे
(पोलीस निरीक्षक मानव संसाधन विकास शाखा)

LEAVE A REPLY

*