जि. प., पं. स. पोटनिवडणूक : १८ फेब्रुवारीला प्रारूप मतदार याद्या

jalgaon-digital
1 Min Read

मुंबई | प्रतिनिधी

राज्यातील १९ जिल्हा परिषदा आणि २७ पंचायत समित्यांमधील ६० रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी १८ फेब्रुवारी २०२१ रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यावर २६ फेब्रुवारी २०२१पर्यंत हरकती आणि सूचना दाखल करता येतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली…

भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या आणि १५ जानेवारी २०२१ रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत.

त्या प्रभागनिहाय (निवडणूक विभाग आणि निर्वाचक गण) विभाजित केल्यानंतर १८ फेब्रुवारी २०२१ रोजी प्रारूपाच्या स्वरूपात प्रसिद्ध करण्यात येतील. त्यावर २६ फेब्रुवारीपर्यंत हरकती आणि सूचना दाखल करता येतील.

त्यानंतर ५ मार्च २०२१ रोजी निवडणूक विभाग आणि निर्वाचक गणाच्या छापील मतदार याद्या अंतिम तसेच अधिप्रमाणित करण्यात येतील. मतदान केंद्रांची यादी आणि मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या १० मार्च २०२१ रोजी प्रसिद्ध केल्या जातील, असेही मदान यांनी सांगितले.

Share This Article