मुंबई l Mumbai

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्यांवर काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाणार आहे. उपध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्यांकडे हा राजीनामा दिला आहे. दरम्यान राजकीय वर्तुळामध्ये सुरु असणाऱ्या चर्चांचा संदर्भ देत निलेश राणे यांनी महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंप होणार असल्याचे संकेत दिले आहेत.

निलेश राणे यांनी ट्विट करत म्हंटले आहे की, "अजित पवारांना कधी मुख्यमंत्री होता आले नाही व ते कधी होणार नाहीत, पण कसंतरी उपमुख्यमंत्रीपद मिळालं होतं. पण आता २ उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळणार अशी चर्चा आहे. म्हणजे अजित पवार यांची परत नॉटरिचेबल होण्याची वेळ आली. काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद मिळालच पाहिजे, तो त्यांचा अधिकार आहे." असे निलेश राणे यांनी म्हटले आहे.

तसेच एक वर्षाहून अधिक काळापासून राज्यात सत्तेत असणाऱ्या महाविकासआघाडीमध्ये मुख्यमंत्रीपद हे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे असून उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याकडे आहे. निलेश राणे यांनी केलेला हा दावा राजकीय वर्तुळामध्ये सुरु असणाऱ्या चर्चेच्या आधारे केला असल्याचं सांगण्यात येत आहे.

प्राप्त माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर विधानसभेचे अध्यक्षपद शिवसेनेकडे सोपवण्यात येईल आणि काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद दिले जाईल. विशेष म्हणजे या प्रस्तावाला दोन्ही पक्षांची आणि मुख्यमंत्र्यांची मान्यता मिळाल्याचेही सांगण्यात येत आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी काँग्रेस पक्षातील कोणत्या मंत्र्याकडे जाणार हा मोठा प्रश्न आहे. यासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार या तिघांची नावे चर्चेत आहेत. यात बाळासाहेब थोरात यांचे नाव आघाडीवर आहे.

परंतु, उपमुख्यमंत्रीपद काँग्रेसकडे जाणार या चर्चांमध्ये काही तथ्य नसल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे या तीन नेत्यांनी मिळून महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं आहे. त्यांच्या निर्णयानुसार आम्ही कामं पुढे नेत आहोत. मात्र काँग्रेसमध्ये अंतर्गत बदल होत असतील तर त्यात कुणी पडण्याचे कारण नाही, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजिनामा दिला आहे. यापूर्वी त्यांनी मंत्रिमंडळात आपला सहभाग असावा, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यामुळे काँग्रेसच्या ज्या मंत्र्याची उपमुख्यमंत्रिपदी वर्णी त्या मंत्र्याचे खाते पटोले यांच्याकडे सोपवण्यात येण्याची दाट शक्यता आहे.

उपमुख्यमंत्री म्हणून बाळासाहेब थोरात यांचे नाव आघाडीवर का?

काँग्रेसने विधानसभा निवडणूक थोरात यांच्या नेतृत्वाखाली पार पडली होती. काँग्रेस पक्ष सत्तेत असण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. तसंच महाविकास आघाडी सरकार मधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांसोबत समन्वय ठेवण्याचे काम थोरात यांनी केले आहे. या सर्व गोष्टींमुळे थोरात यांचे पारडे जड आहे.