
मुंबई | Mumbai
महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या जागी अमरिंदर सिंह यांना राज्यपाल पदाची जबाबदारी दिली जाऊ जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोश्यारी कोणत्याही क्षणी पदमुक्त होऊ शकतात, अशी माहिती मिळत आहे...
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आपल्याला पदमुक्त करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर असताना राज्यपाल कोश्यारींनी ही विनंती केली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर महाराष्ट्रातून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. राज्यपालांना तातडीने पदावरून दूर करा, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली होती. आता राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
कोण आहेत कॅप्टन अमरिंदर सिंग?
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी जवळपास नऊ वर्षे पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. गेल्या वर्षी काँग्रेसचा राजीनामा देऊन त्यांनी आपला नवा पक्ष स्थापन केला. पंजाब विधानसभा निवडणुकीत कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी भाजपसोबत युती करून निवडणूक लढवली होती.
मात्र युतीला निवडणुकीत चांगली कामगिरी करता आली नाही. स्वतः कॅप्टन अमरिंदर सिंग यांनाही त्यांची जागा वाचवता आली नाही. त्यानंतर अमरिंदर सिंग भाजपमध्ये सामील झाले.