
मुंबई । Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित राहिल्याने काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून नाराजीचा सूर उमटला. शरद पवार नरेंद्र मोदींच्या गौरव सोहळ्याला का गेले असतील, याबद्दल वेगवेगळे कयास लावले जात असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी याबद्दल मोठा खुलासा केला. जितेंद्र आव्हाड यांनी एका कार्यक्रमात याबद्दल भूमिका मांडली.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, या पुरस्कार सोहळ्याला जाऊ नका, असे त्यांना कित्येकांनी सांगितले. पण ते कार्यक्रमाला जाऊन आले. या कार्यक्रमात काँग्रेसचे जेष्ठ नेते सुशील कुमार शिंदे देखील हजर होते. त्यावर फार चर्चा झाली नाही. पण शरद पवारांबद्दल झाली. मला शरद पवारांचा स्वभाव माहिती आहे. ते कुठल्या ही अग्रलेखाने किंवा वैयक्तिक टीकेतून भूमिका बदलतील, हे शक्य नाही, अशा शब्दात त्यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला. तसेच पुढे बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, ते पंतप्रधानांना वैचारिक विरोध कायम करत राहतील. पण वैयक्तिक द्वेष कधीच करणार नाही. मी माझ्या अंदाजाने ठरवले की, काँग्रेस संस्कृतीत वाढलेल्या लोकमान्य टिळकांबद्दल बोलायचे आणि लोकमान्य टिळक यांचे देश आणि काँग्रेससाठीचे योगदान यांच्यावर यांच्यावर ते बोलणार आहोत.
या कार्यक्रमात जितेंद्र आव्हाडांनी शरद पवारांचा अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळातील किस्सा सांगितला. जितेंद्र आव्हाड म्हणाले, शरद पवारांचा दरवाजा हा कुणासाठी कधीच बंध नसतो. कारण, संवाद ही त्यांची मुख्य ताकद आहे आणि देशातील प्रत्येक पक्षाशी संवाद असणारे नेते हे शरद पवार आहेत. जेव्हा अटलबिहारी वाजपेयींच सरकार पडले. तेव्हा एका मतांचे गणित होते आणि हे एक मत कुणी फिरवले. कारण त्यांचा मायावतींशी संवाद होता. जर शरद पवारांना अजित पवारांनी फोन करून बोलले, तर देखील ते त्यांची भूमिका बदलणार नाही.