भाजपा-बॉलिवूड-सँडलवूड-गोवा ड्रग कनेक्शनची चौकशी NCB का करत नाही?

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा सवाल
Congress Spokesperson Sachin Sawant
Congress Spokesperson Sachin Sawant

मुंबई | Mumbai

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातून (Sushant Singh Rajput case) बॉलिवूडचे ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर NCB ने काही लोकांना अटक केली. आता याप्रकरणी बॉलिवूडमधील काही कलाकारांची चौकशी होत आहे. भारतीय जनता पार्टी-बॉलिवूड-सँडलवूड-गोवा ड्रग कनेक्शनची चौकशी NCB का करत नाही? तसेच NCB आता ‘नमो कंट्रोल्ड ब्युरो’ झाला आहे का? असा संतप्त सवाल काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत (Congress Spokesperson Sachin Sawant) यांनी केला आहे. सचिन सावंत यांनी ट्विटरवर व्हिडीओ शेअर करत हा सवाल उपस्थित केला आहे.

सचिन सावंत यांनी म्हंटले आहे की, "भाजपचे बॉलिवूडमधील ड्रग कनेक्शन, सँडलवूड आणि गोवा प्रकरणाकडे NCB ला दुर्लक्ष करू देणार नाही. एका ५९ ग्रॅम गांजाप्रकरणी NCB एवढा मोठा गाजावाजा करत असताना याचवेळी कर्नाटकमध्ये भाजपचा कार्यकर्ता चंद्रकांत चौहानला (Chandrakant Chauhan) १२०० किलो गांजासह अटक करण्यात आली. याकडे NCB ने ढुंकूनही पाहिले नाही. कर्नाटकात अभिनेत्री रागिनी द्विवेदी (actress Ragini Dwivedi) हिला सँडलवूड ड्रग रॅकेट (Sandalwood-drugs racket) प्रकरणात अटक करण्यात आली. अभिनेत्री रागिनी ही कर्नाटक भाजपाची स्टार प्रचारक होती. याच प्रकरणात १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये आदित्य अल्वा (Aditya Alva) या व्यक्तीलाही अटक करण्यात आली. अल्वा हा गुजरात भाजपाचा स्टार प्रचारक अभिनेता विवेक ओबेरॉयचा (actor Vivek Oberoi) सख्खा मेव्हणा आहे आणि विवेक ओबेरॉय हा मोदी बायोपिकचा निर्माता संदीप सिंह (Ssandip Singh)बरोबर सहनिर्माता आहे आणि मोदींची मुख्य भूमिकाही विवेकनेच साकारली आहे. विवेक हा संदीप सिंहच्या निर्मिती कंपनीत भागीदार आहे." तसेच "गुजरात राज्य सरकारने संदीप व विवेकच्या कंपनीबरोबर १७७ कोटी रुपयांचा सामंजस्य करार केला. या मोदी बायोपीकचे पोस्टर रिलीज हे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास उपस्थितीत करण्यात आले होते. याच संदीपसिंहने भाजपा कार्यालयात ५३ वेळा फोन कोणाला केले होते आणि संदिपसिंहला मॉरिशसमध्ये एका प्रकरणात कोणी मदत केली होती याचा खुलासा अद्याप झालेला नाही. हे सर्व एकमेकाशी संबंधीत आहे. महाराष्ट्र सरकारने या संबंधाची माहिती सीबीआयला दिलेली आहे. परंतु आजपर्यंत या अँगलचा तपास का केला नाही, याचे आश्चर्य आहे."

कंगना रनौत प्रकरणावरून एनसीबीवर प्रश्न उपस्थित

NCB च्या ड्रग्ज कनेक्शन चौकशीतून कंगना रनौत (Kangana Ranaut) गायबच आहे. कंगणाचा ड्रग घेतल्यासंदर्भातील व्हिडीओ हा पुरावा आहे. आपण ड्रग्ज घेत होतो असे तिने स्वतः कबुल केले आहे. असं असताना तिची चौकशी का केली जात नाही. NCB व्हॉट्सअप चॅटवरून चौकशीसाठी बोलावत असेल तर कंगनाच्या व्हिडिओकडे डोळेझाक का?', असे अनेक प्रश्न देखील सचिन सांवत यांनी उपस्थित केले आहेत. तसेच या सर्व उपस्थित प्रश्नांची उत्तरे आता NCB नी दिली पाहिजेत अस म्हणताना, NCB कोणाला वाचवण्यासाठी तपास करत असेल तर आम्ही ते होऊ देणार नाही, असा इशारा देखील सावंत यांनी दिला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com