Saturday, April 27, 2024
Homeराजकीयदुधाच्या प्रश्नावर जाणता राजा गप्प का ?

दुधाच्या प्रश्नावर जाणता राजा गप्प का ?

लोणी |वार्ताहर|Loni

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे दूध संघ असल्याने ते दुधाचे दर वाढू देत नाहीत, असा गंभीर आरोप करताना या प्रश्नावर जाणता राजा गप्प का? असा सवाल माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

- Advertisement -

निष्क्रीय आणि निद्रीस्त महाविकास आघाडी सरकारमुळे राज्यातील शेतकर्‍यांवर ‘मागण्यांचा पोळा’ साजरा करण्याची वेळ आली असल्याचे सांगत आ. विखे पाटील यांनी दूध उत्पादकांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात यासाठी मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री निवासस्थानी पत्र पाठवून ूमहादूध आंदोलनाचा प्रारंभ केला.

राज्यातील दूध उत्पादकांच्या मागण्यांसाठी भाजपा महायुतीच्यावतीने मुख्यमंत्र्यांना 5 लाख पत्र पाठविण्याचे महादूध आंदोलन सुरू करण्यात आले आहे. नगर जिल्ह्यातील आंदोलनाची सुरुवात माजीमंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लोणी बुद्रुक येथील पोष्ट कार्यालयातून पत्र पाठवून करण्यात आली. पोळ्याचा आनंददायी सण असतानाही शेतकर्‍यांना आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर येण्यास भाग पाडणार्‍या महाविकास आघाडी सरकारचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध केला.

प्रारंभी आ. विखे पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांनी गोधनाचे पूजन करून अतिशय साध्या पध्दतीने पोळा सण साजरा केला. त्यानंतर लोणी बुद्रुक पोस्ट कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात जिल्हा बँकेचे संचालक अण्णासाहेब म्हस्के पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील, भाजपचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, तालुकाध्यक्ष नंदकुमार जेजूरकर, ट्रक्स वाहतूक सोसायटीचे चेअरमन नंदू राठी,

किसनराव विखे, सुभाषराव विखे, सोसायटीचे चेअरमन सी. एम. विखे, संपतराव विखे, एम. वाय. विखे, सिनेट सदस्य अनिल विखे, सरपंच लक्ष्मण बनसोडे, उपसरपंच अनिल विखे, एन. डी. विखे, रावसाहेब साबळे, भाऊसाहेब विखे, शंकर विखे, गणेश विखे आदिंसह दूध उत्पादक शेतकर्‍यांनी पोष्ट कार्यालयात येऊन मागण्यांचे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठविले.

आ. विखे पाटील म्हणाले की, बैल पोळ्याचा सण हा बळीराजासाठी आनंदाचा दिवस असतो. परंतु या नाकर्त्या सरकारमुळे शेतकर्‍यांच्या नशिबी दु:खाचे सावट आहे. आव्हानात्मक परिस्थितीत शेतकरी सण साजरा करतोय. सर्जा राजाला सजवून मिरवण्याचा दिवस असतानासुध्दा शेतकर्‍यांना रस्त्यावर उतरून मागण्यांचा पोळा साजरा करण्याची वेळ या सरकारने आणली हे दुर्दैवी असल्याचे सांगितले.

यापुर्वी राज्यात दूध उत्पादकांचे रस्त्यावर उतरून आंदोलने झाली. सरकार निर्णय घेईल, घोषणा करील अशी अपेक्षा दूध उत्पाकांची होती. परंतु सरकारचे वेळकाढू धोरणामुळे दूध उत्पादकांची चेष्टाच सुरू असल्याची टीका त्यांनी केली.

महिना उलटून गेल्यानंतर महाविकास आघाडी सरकार दूध उत्पादक शेतकर्‍यांना न्याय देऊ शकलेले नाही. सरकारमध्ये सहभागी असलेले मंत्री आणि शेतकर्‍यांचा कैवार असलेले दूध उत्पादकांच्या प्रश्नांवर बोलायला तयार नाहीत.

म्हणूनच निद्रीस्त आणि निष्क्रीय असलेल्या सरकारला जागे करण्यासाठी आणि मुख्यमंत्र्यांना दूध उत्पादकांचे दु:ख समजावे म्हणून पोळा सणाच्या दिवशी मुख्यमंत्र्यांना दूध उत्पादकांच्या मागण्यांचे पत्र पाठवून महादूध आंदोलन आजपासून सरू केले असून राज्यातून 5 लाख आणि नगर जिल्ह्यातून10 हजार पत्र पाठविणार असल्याचे आ. विखे पाटील यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या