Wednesday, May 8, 2024
Homeराजकीय…तर नरेंद्र मोदी मोहन भागवतांनाही दहशतवादी म्हणतील, राहुल गांधींचा हल्लाबोल

…तर नरेंद्र मोदी मोहन भागवतांनाही दहशतवादी म्हणतील, राहुल गांधींचा हल्लाबोल

दिल्ली l Delhi

मोदी सरकारच्या तीन नवीन कृषी कायद्यांविरोधात शेतकर्‍यांची चळवळ अजूनच आक्रमक होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसही आक्रमक झाली आहे. कृषी कायद्यांवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्रातील भाजप सरकारविरोधात जोरदार हल्ला चढवला आहे.

- Advertisement -

केवळ चारपाच उद्योगपतींसाठी काम करणारे हे सरकार आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवत आहे. उद्या जर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे मोदींविरोधात बोलल्यास त्यांनाही अतिरेकी ठरवलं जाईल, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी भाजपवर हल्ला चढवला.

राहुल गांधींसोबत काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद आणि अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली. यावेळी त्यांनी राष्ट्रपतींनी नवे कृषी कायदे शेतकरीविरोधी असल्याचं सांगितलं. “जो विरोधात उभं राहतं त्याच्याविरोधात मोदी काही ना काहीतरी चुकीचं बोलत असतात. शेतकरी उभे राहिले तर शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणतील. मजूर उभे राहिले तर त्यांना दहशतवादी म्हणतील. एखाद्या दिवशी मोहन भागवत उभे राहिले तर त्यांनाही दहशतवादी म्हणतील. थोडक्यात जो कोणी मोदींकडून सत्ता घेण्याचा प्रयत्न करणार त्याला दहशतवादी ठरवलं जाणार,” असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी यावेळी केला.

पुढे ते म्हणाले की, “भाजपा आणि नरेंद्र मोदींचं एकच ध्येय असून ते शेतकरी आणि मजुरांना कळलं आहे. आपल्या आसपास जे दोन चार मोठे उद्योगपती आहेत त्यांच्यासाठी पैसे उभं करण्याचं काम नरेंद्र मोदी करतात. त्यांच्याकडे संपूर्ण भारत सोपवला आहे”.

“करोनामुळे नुकसान होणार सांगितलं होतं पण कोणी ऐकलं नाही. आज मी पुन्हा सांगतोय की शेतकरी, मजुरासमोर कोणतीही शक्ती उभी राहू शकत नाही. जर पंतप्रधांनी कायदा कायदा मागे घेतला नाही तर फक्त भाजपा, आरएसएस नाही तर देशाचं नुकसान होणार आहे,” असा इशारा राहुल गांधी यांनी यावेळी दिला.

“मला पंतप्रधानांना सांगायचं आहे की, जोपर्यंत कृषी कायदे रद्द होत नाहीत तोवर शेतकरी परतणार नाहीत. सरकारने संसदेचं संयुक्त अधिवेशन बोलवावं आणि हे कायदे मागे घ्यावेत. विरोधी पक्ष शेतकरी आणि मजुरांसोबत आहेत,” असं राहुल गांधी यांनी यावेळी सांगितलं. चीनने भारताची जमीन बळकवली आहे. परंतू, चीनप्रश्नी पंतप्रधान काहीच बोलत नाहीत. या विषयावर ते सोईस्कर मौन बाळगून असतात असेही ते म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या