मुंबई | Mumbai

दिल्ली आणि अन्य ठिकाणी सुरू असलेली आंदोलने ही राजकीय आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शेतीमधील काय समजते? ते या कायद्याला विरोधच करणारच,

अशी जोरदार टीका भाजप नेते आणि खासदार नारायण राणे यांनी केली. केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांच्या समर्थनार्थ कणकवली येथे आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार रविंद्र चव्हाण आणि आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितित भव्य ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. यावेळी भाजपा नेते नारायण राणे बोलत होते.

यावेळी नारायण राणे म्हणाले, “पंतप्रधान मोदींकडून एका बाजूला देशाला महासत्ता बनवण्याचा प्रयत्न सुरू आहेत व दुसऱ्या बाजूला नागरिकांना समृद्ध करण्याचा प्रयत्न देखील सुरू आहे. तसेच, या देशाचा प्रमुख घटक शेतकरी आहे. आमच्या शेतकऱ्याला सबळ बनवलं पाहिजे, आर्थिक समृद्ध बनवलं पाहिजे. या कष्टकऱ्याला त्याच्या श्रमाचा फायदा मिळाला पाहिजे. या दृष्टीकोनातूनच त्यांनी हे विधेयक आणलं आहे.” तसेच, “मी राज्यसभेचा सदस्य आहे. राज्यसभेत हे विधेयक आलं तेव्हा अतिशय चांगली चर्चा झाली. तेव्हा आमच्या विरोधकांपैकी कुणी विरोध दर्शवला नाही, उलट कौतुक केलं. ७० वर्षांमध्ये काँग्रेसला जे जमलं नाही. शेतकऱ्यांसाठी काही करू शकले नाहीत. तेच आज विरोध करत आहेत, आंदोलन करत आहेत. कोण आहेत विरोधक? स्वतः करू शकले नाहीत. शेतकऱ्यांनी पिकवलेला माल विकायला देखील बंधनं, कायदे होते. माल कुठं विकायचा? कसा विकायचा? कोणा मार्फत विकायचा? का दलाल मार्फत विकायचा मग कष्टाचे पैसै मिळाले नाही तरी तोट्यात जाऊन विकायचा. ही गेली ७० वर्षांमधील कायदे व नियम पंतप्रधान मोदींनी मोडीत काढले.” असल्याचं देखील राणेंनी यावेळी सांगितलं.

“आपला शेतकरी कष्टाने जे पिकवतो, उत्पादन घेतो. त्याला जिथं जास्त पैसे मिळतील तिथे त्याने माल विकावा. योग्य मोबदला मिळाला याचं शेतकऱ्यांना समाधान मिळालं पाहिजे. म्हणून असा कायदा पंतप्रधान मोदींनी आणला. शेतकऱ्यांच्या हिताचा बंधनं सर्व काढून टाकली तर मग चुकलं काय? का इथं आंदोलनं होत आहेत? ही राजकीय आंदोलनं आहेत. यात समेट होईल असं मला वाटत नाही. राहुल गांधीला शेतीमधलं काय कळतं? आणि शेतकऱ्यांना पाठिंबा देण्याचा गोष्टी करतात. ठराविक राज्यातील शेतकरी आहेत. जे दलाल होते त्यांना आंदोलन करायला लावलं आहे, कामाला लावलं आहे, खर्चाला लावलं आहे.” असं देखील राणेंनी यावेळी बोलून दाखवलं.