दिल्ली | Delhi

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय हिंसाचार उफाळल्याचं दृश्य दिसते आहे. पश्चिम बंगालमध्ये गुरुवारी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या दगडफेकीच्या घटनेला केंद्र सरकारने गंभीरपणे घेतले असून राज्यपाल जगदीप धनखड़ यांच्याकडून अहवाल मागविला होता. धनखड यांचा अहवाल मिळताच केंद्राने तातडीने बंगालचे डीजीपी आणि मुख्य सचिवांना दिल्लीला बोलवून घेतले असून पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे संकेत राज्यपालांनी दिले आहेत.

“मुख्यमंत्री ममता बॅनर्जी घटनात्मक बांधील आहेत. त्यांना घटनेचं पालन करावंच लागेल,” असं राज्यपालांनी सांगितलं आहे. यावेळी त्यांनी राज्यातील ढासळत्या कायदा सुव्यवस्थेसाठी ममता बॅनर्जी सरकारला जबाबदार ठरवलं. यावेळी त्यांनी ममता बॅनर्जी यांनी बाहेरचे उल्लेख करत भाजपासंबंधी केलेल्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत म्हटलं की, “भारतीयांबद्दल बाहरेचे म्हणून बोलत आहेत का ? मुख्यमंत्री मॅडम आगीशी खेळू नका”.

“काल जे झालं ते फार दुर्दैवी होती. लोकशाहीत प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. तेदेखील राज्यातील नेत्यांना न घाबरता,..पण गुरुवारी तसं झालं नाही,” अशी खंत राज्यपालांनी व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी जे पी नड्डा आणि कैलाश विजयवर्गीय यांच्या ताफ्यावर हल्ला करणारे राज्य सरकारचं समर्थन असणारे होते असा गंभीर आरोपही केला.

“माझी ममता बॅनर्जींना विचार करावा अशी विनंती आहे. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याची मी गंभीर दखल घेतली आहे. कायदा आणि राज्यघटनेवर विश्वास असणारी मुख्यमंत्री असं वक्तव्य कसं काय करु शकते?,” अशी विचारणा त्यांनी केली आहे. बंगाली संस्कृतीचा विचार करुन आपण माफी मागा असं आवाहन त्यांनी केलं आहे.

नड्डांच्या ताफ्यावर हल्ला

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे सध्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी भाजपा २०० जागा जिंकेल असे विश्वास व्यक्त केला होता. त्याच्या दुसऱ्या दिवशीच जेपी नड्डांच्या ताफ्यातील वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. मोठमोठे दगड, सिमेंटचे ब्रिक्स फेकून गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्याने मोठे तणावाचे वातावरण आहे. ममता बॅनर्जी यांचा भाचा आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या लोकसभा मतदारसंघात डायमंड हार्बरमध्ये जात होते. भाजपाने आरोप केला की, नड्डा आणि कैलास विजयवर्गीय यांच्या ताफ्यावर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. दक्षिण 24 परगनामध्ये टीएमसी आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांचा आरोप आहे की, टीएमसी कार्यकर्त्यांनी भाजपाचे अध्यक्ष नड्डा यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी मोठमोठे दगड फेकले. सुरक्षा दलाने नड्डांच्या कारला सुरक्षित बाहेर काढले.

नड्डांवरचा हल्ला बनावट - खासदार महुआ मोईत्रा

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी नड्डांवरील हा हल्ला बनावट असल्याचा दावा केलाय. 'महाविद्यालयांच्या BYOB (ब्रिंग युअर ओन बॉटल) बद्दल ऐकलं होतं... भाजप नेते पश्चिम बंगालमध्ये दररोज BYOS (ब्रिंग युअर ओन सिक्युरिटी) सोबत दाखल होतात. राज्यात दौऱ्यावर येणारा भाजपचा कुणीही ऐरा-गैरा नेता आपल्यासोबत येताना सीआरपीएफ, सीआयएसएफ आणि केंद्रीय दलाच्या जवानांना घेऊन येतो. लज्जास्पद, 'बनावट' हल्ल्यांपासून ते तुमची सुरक्षा करू शकले नाहीत' असं ट्विट महुआ मोईत्रा यांनी केलंय.

दरम्यान, तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नड्डांच्या ताफ्यावर हल्ला केल्याचा आरोप केला जात असतानाच ममता यांनी भाजपाच्या नेत्यांकडे आणि कार्यकर्त्यांकडे काही काम नसल्याचा टोला लगावला आहे. “त्यांना दुसरी काही कामं नाहीयत. कधी इथे केंद्रीय गृहमंत्री येतात तर कधी चड्डा, नड्डा, फड्डा, भड्डा. जेव्हा त्यांच्याकडे कोणी प्रेक्षक नसतात तेव्हा ते त्यांच्या कार्यकर्त्यांना नौटंकी करण्यासाठी बोलवतात,” असंही ममता यांनी नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात बोलताना म्हटलं आहे.

नड्डा यांच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या आणि त्यामागे जाणाऱ्या प्रसारमाध्यमांच्या गाड्यांबद्दलही ममता यांनी शंका उपस्थित केलीय. “तुमच्या नेत्यांचं इथे स्वागत आहे. मात्र आम्ही हिंसेला विरोध करतो,” असं ममता यांनी कोलकात्यामधील मायो रोड येथील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर दिलेल्या भाषणामध्ये म्हटलं आहे. “तुमच्या ताफ्यामागे ५० गाड्या का होत्या? बाईक आणि प्रसारमाध्यमांचा गाड्या का होता? तिथे कोण उभं होतं? दगड कोणी फेकले? ते सर्व नियोजित होतं का? तुम्ही खूप हुशार आहात,” असं ममता यांनी भाजपावर टीका करताना म्हटलं आहे.

भाजपा केवळ नाटकं करत असल्याची टीका ममतांनी केली आहे. “मी दिल्लीला जाते तेव्हा काय होतं? मी दिल्लीत डेरेक (डेरेक ओ ब्रायन तृणमूलचे खासदार आहेत) यांच्या घरी राहते. दरवेळी मी तिथे गेल्यावर भाजपाचे कार्यकर्ते त्या घराला घेरतात,” असंही ममता यांनी म्हटलं आहे. “त्यांना दुसरी काही कामं नाहीयत. कधी इथे केंद्रीय गृहमंत्री येतात तर कधी चड्डा, नड्डा, फड्डा, भड्डा. जेव्हा त्यांच्याकडे कोणी प्रेक्षक नसतात तेव्हा ते त्यांच्या कार्यकर्त्यांना नौटंकी करण्यासाठी बोलवतात,” असंही ममता यांनी नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात बोलताना म्हटलं आहे.