…तर भाजपाला ५० जागाही जिंकता आल्या नसत्या; ममतांची सडकून टीका

jalgaon-digital
2 Min Read

दिल्ली l Delhi

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसला दणदणीत विजय मिळाला आहे. भाजपला सत्ता मिळवण्यात अपयश आले आहे. ममता बॅनर्जी वैयक्तिकरित्या नंदीग्राममधून निवडणूक हरल्या असल्या तरी विधानसभा निवडणुकीत २०० पेक्षा जास्त जागा जिंकत टीएमसी पुन्हा एकदा सत्ता राखण्यात यशस्वी झाली आहे.

ममता बॅनर्जी यांनी विजयाची हॅटट्रिक साधली आहे. भाजपला ८० जागांच्या जवळपास जागा जिंकता आल्याने भाजप सत्तेपासून दूर गेला आहे. या विजयानंतर बोलताना ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. ‘निवडणूक आयोगाने मदत केली नसती, तर भाजपाला ५० जागाही जिंकता आल्या नसत्या’ असे म्हंटल निवडणूक आयोगावर त्यांनी गंभीर आरोप केला आहे.

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलतांना ममता बॅनर्जी यांनी म्हंटल आहे की, ‘तृणमूल काँग्रेसची यंदा डबल सेंच्युरी होईल आणि आम्ही २२१ चा आकडा गाठू, असा आम्हाला विश्वास होता. मी रस्त्यावर उतरून लढणारी बाई आहे. पहिल्यापासूनच मी सांगत होते की, आम्ही दोनशेपार जाऊ तर भाजप ७० पारही जाणार नाही. निवडणूक आयोगाने भाजपला मदत केली नसती तर त्यांना ५०जागाही मिळाल्या नसत्या,’ असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले.

तसेच, ‘पश्चिम बंगालमध्ये काही ठिकाणी ईव्हीएम यंत्रांशी छेडछाड करण्यात आली. तर काही ठिकाणी पोस्टल बॅलेटस् रद्द ठरवण्यात आली, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला. मात्र, मी बंगालच्या लोकांना सलाम करते. त्यांनी फक्त पश्चिम बंगालच नव्हे तर संपूर्ण देशाला वाचवल्याचे’ ममता बॅनर्जी यांनी सांगितले.

ममता बॅनर्जी आपल्या पराभूत जागेबद्दल बोलतांना म्हणाल्या की, ‘नंदीग्राम मतदारसंघात माझा अजून पराभव झालेला नाही. आम्ही त्याठिकाणी पुन्हा मतमोजणी करण्याची मागणी केली आहे. त्याठिकाणी काही फेरफार करण्यात आले आहेत. मतदानाच्यादिवशीही मी नंदीग्राममध्ये एका मतदान केंद्राबाहेर तीन तास बसून होते. कारण त्याठिकाणी लोकांना मतदान करुन दिले जात नव्हते. मात्र, नंदीग्राममध्ये पुन्हा मतमोजणी करण्यासाठी न्यायालयात जाणार का, याविषयी अद्याप निर्णय झाला नसल्याचे ममता बॅनर्जी यांनी सांगितलं आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *