West Bengal Election 2021 : मतदान केंद्रावरुन ममता बॅनर्जींचा थेट राज्यपालांना फोन, म्हणाल्या…

jalgaon-digital
3 Min Read

नंदिग्राम | Nandigram

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. दुसऱ्या टप्प्यात एकूण ३० जागांसाठी मतदान होणार असून यामध्ये नंदीग्राम विधानसभा मतदारसंघाचाही समावेश आहे.

दरम्यान, नंदीग्राम येथील मतदान केंद्रावर भाजपा आणि टीएमसी कार्यकर्ते आमने-सामने आल्यानंतर परिस्थिती हाताबाहेर गेली होती. पोलीस परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ममता बॅनर्जीदेखील नंदीग्राम येथील मतदान केंद्राबाहेर थांबल्या असून तिथे प्रसारमाध्यमांशी बोलताना गोंधळ घालण्यासाठी बाहेरील लोकांना येथे आणण्यात आल्याचा आरोप केला. त्यांना खासकरुन याच कामासाठी आणण्यात आल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं.

ममता बॅनर्जी यांनी यावेळी केंद्रीय यंत्रणा मतदारांना मतदान करण्यासाठी केंद्रात प्रवेश करु देत नसल्याचा आरोप केला. ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राममधील मतदान केंद्राबाहेर आंदोलनच सुरु केलं आहे. ममता बॅनर्जी यांनी राज्यपालांना फोन करुन मतदानावेळी मोठी गडबड केली जात असल्याचा आरोप केला आहे. तसंच याबाबत आपण कोर्टात जाणार असल्याचंही ममता बॅनर्जी यांनी सांगितलं आहे. यानंतर ममता बॅनर्जी यांनी थेट राज्यपालांना फोन केला आणि स्थानिकांना मतदान करु दिलं जात नसल्याची तक्रार केली.

ममता बॅनर्जी यांनी राज्यपालांना फोनवरुन सांगितलं की, ‘केंद्रीय यंत्रणा स्थानिकांना मतदान करु देत नाही आहेत. सकाळपासून मी तक्रार करत आहे, पण आता मी तुम्हाला विनंती करत आहे. कृपया यामध्ये लक्ष घाला’.

तसेच, ममता बॅनर्जी जेव्हा बूथवर दाखल झाल्या तेव्हा भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ घातला आणि एकमेकांवर आरोप लावले. भाजपचे लोक मतदान केंद्रांवर ताबा मिळवत मतदान प्रक्रिया प्रभावित करत आहेत, असा आरोप तृणमूलकडून करण्यात येतोय. ममता बॅनर्जी नंदीग्रामच्या ब्लॉक टू मधील मुस्लिम बहुल भागाचाही दौरा करणार असल्याची माहिती मिळतेय.

दरम्यान, पश्चिम बंगालच्या राजकारणामध्ये ‘नंदीग्राम’ला विशेष महत्व आहे. २०००च्या दशकात ममता बॅनर्जी यांनी येथेच शेतकऱ्यांच्या हक्कांची पायमल्ली होत असल्याचा दावा करत आंदोलन छेडलं होत. आंदोलनाचा चेहरा बनलेल्या ममतांनी पुढे राज्यातील डाव्यांची सत्ता उलथवून टाकत सत्तेच्या चाव्या काबीज केल्या होत्या. राजकीयदृष्टया महत्वाच्या असलेल्या नंदीग्राम विधानसभा मतदारसंघाचे महत्व यंदा अधिकच वाढलं आहे. येथे तृणमूलचे महत्वाचे नेते मानले जाणारे सुवेंदू अधिकारी यंदा भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. तर दुसरीकडे पक्षाला लागलेली गळती व राज्यात भाजपने लावलेली संपूर्ण ताकद या परिस्थितीत ममता बॅनर्जी लढा देत आहेत. नंदिग्रामचे महत्व जाणूनच भाजपच्या गोटामध्ये सामील झालेल्या सुवेंदू अधिकारी यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय ममता बॅनर्जींनी घेतला आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *