Friday, April 26, 2024
Homeराजकीयठरलं! ममता बॅनर्जी नंदीग्राम येथून लढणार निवडणूक

ठरलं! ममता बॅनर्जी नंदीग्राम येथून लढणार निवडणूक

कोलकाता | Kolkata

पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने आज आपल्या २९१ उमेदवारांची यादी घोषित केली आहे.

- Advertisement -

तृणमूल काँग्रेसच्या सर्व्हेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ही यादी जाहीर केली. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यंदा नंदीग्राम मधून निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ममता बॅनर्जी यांनी २९४ पैकी तीन जागा मित्रपक्षांसाठी उत्तर बंगाल आणि इतर ठिकाणच्या सोडल्या असल्याची माहिती दिली आहे. यादी जाहीर करताना ममता बॅनर्जी यांनी, यामध्ये एकूण ५० महिला उमेदवार, ४२ मुस्लिम उमेदवार, ७९ अनुसूचित जातीमधील उमेदवार आणि १७ अनुसूचित जमातीमधील उमेदवार असल्याची माहिती दिली आहे.

तसेच ममता बॅनर्जी जिथून आधी निवडणूक लढल्या त्या भवानीपुर येथून सोवानदेब चॅटर्जी यांना संधी देण्यात आली आहे. ममता यांनी घोषणा केली आहे की ८० वर्षाहून जास्त वय असलेल्या व्यक्तींना उमेदवारी देण्यात येणार नाही. तृणमूलचे ज्येष्ठ नेते मदन मित्रा यांना कमरहाटी, मंत्री शशि पांजा यांना श्यामपुकुर येथून तिकीट देण्यात आले आहे. बांकुरा येथून फिल्मस्टार सायानतिका, उत्तरपाडाहून कंचन मलिक, शिबपुर येथून क्रिकेटर मनोज तिवारी यांना तिकीट देण्यात आलं आहे. गायिका अदिति मुंशी यांना राजरहाट, चंद्रिमा भट्टाचार्य यांना उत्तर दमदम मधून तिकीट देण्यात आले आहे.

ममता बॅनर्जी यांनी दावा केला की, टीएमसीने त्याच उमेदवारांना तिकीट दिले. ज्यांना जनता पाठिंबा देऊ इच्छिते. काही लोकांना तिकीट मिळू शकले नाही. परंतू, प्रयत्न केला जाईल की त्यांना विधान परिषदेवर पाठविण्यात येईल. मिळालेल्या माहितीनुसार ममता बॅनर्जी यांनी २८ विद्यमान आमदारांना तिकीट दिले नाही. यात अर्थमंत्री अमित मित्रा यांचाही समावेश आहे.

ममता बॅनर्जी यांनी आजच का जाहीर केली यादी?

ममता बॅनर्जी या शुक्रवार हा आपल्यासाठी लकी दिवस मानतात. त्यामुळे त्यांनी या वेळी उमेदवार यादी जाहीर करतानाही शुक्रवारचीच निवड केली. विशेष म्हणजे या आधी २०११ आणि २०१६ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतही ममता बॅनर्जी यांनी उमेदवार यादी जाहीर करण्यासाठी शुक्रवारचाच दिवस निवडला होता.

दरम्यान, नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेल्या ममता बॅनर्जी यांचा सामना सुवेंदू अदिकारी यांच्याशी होणार हे जवळपास निश्चित आहे. परंतू, ममता यांचा सामना नक्की कोणाशी होणार याची स्पष्टता भाजपने आपली उमेदवार यादी जाहीर केल्यानंतर होणार आहे. भाजपने अद्याप आपली उमेदवार यादी जाहीर केली नाही.

यादी जाहीर करतच ममता बॅनर्जी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाला कडवी झुंज देण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. आठ टप्प्यांमध्ये ही निवडणूक पार पडणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या