Thursday, April 25, 2024
Homeराजकीयपंतप्रधान मोदींचा ‘तृणमूल’ काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल

पंतप्रधान मोदींचा ‘तृणमूल’ काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल

दिल्ली | Delhi

पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

- Advertisement -

दरम्यान, या निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज कोलकातामध्ये जंगी सभा झाली. या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांसह पश्चिम बंगालमधील सत्ताधारी ‘तृणमूल’ काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू झाला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली सभा कोलकातातील ब्रिगेड मैदानावर पार पडली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तृणमूल काँग्रेससह डावे पक्ष आणि काँग्रेसवर निशाणा साधला. पंतप्रधान उपस्थितांना संबोधित करताना मोदी म्हणाले, बंगालमध्ये जन्म घेतलेल्या महान व्यक्तींनी एक भारत, श्रेष्ठ भारत ही भावना बळकट केली. बंगालच्या याच भूमीने एक संविधान, एक निशान, एक पंतप्रधान यासाठी बलिदान देणारा पूत्र दिला. अशा पवित्र भूमीला मी नमन करतो. या भूमीने संस्काराची ऊर्जा दिली. या भूमीने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात प्राण फुंकले. बंगालच्या या भूमीने ज्ञान आणि विज्ञानाच्या क्षेत्रात भारताची मान उंचावली. त्याच बंगालला ममता बॅनर्जी यांनी धोका दिला, अशी टीका मोदी यांनी केली.

तसेच, बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी केंद्राच्या योजना गरीबांपर्यंत पोहोचू दिल्या नाही. कारण ममता सरकारने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. माँ, माटीचीची चर्चा करणाऱ्यांनी बंगाल विकला आहे. तृणमूल काँग्रेसमध्ये निवडणूक खेला होबे… पण पश्चिम बंगालमध्ये इतके घोटाळे झाले आहेत की आता ममता बॅनर्जींचाच खेळ संपणार आहे, अशी टीका पंतप्रधान मोदींनी केली.

बंगालने परिवर्तनासाठी ममता दीदींवर विश्वास टाकला होता. पण, दीदी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी बंगालचा विश्वासघात केला. या लोकांनी बंगालला अपमानित केलं. इथल्या बहिणी आणि मुलींवर अत्याचार केले. यावेळच्या विधानसभा निवडणुकीत एका बाजूला तृणमूल काँग्रेस, डावे आणि काँग्रेस, त्यांचा बंगाल विरोधी वागणूक आहे. तर दुसऱ्या बाजूला बंगालची जनता पाय रोवून उभी आहे. ब्रिगेड मैदानावरील जनतेचा आवाज ऐकल्यानंतर कुणालाही शंका राहणार नाही, असंही मोदी म्हणाले.

या ब्रिगेड मैदानावरून तुम्हाला आशोल पोरिबोरतोची ग्वाही देण्यासाठी आलो आहे. मी तुम्हाला विश्वास देण्यासाठी आलोय. विश्वास बंगालच्या विकासाचा. बंगालमधील परिस्थिती बदलण्याचा. बंगालमध्ये गुंतवणूक वाढवण्याचा. बंगालचं पुनर्निर्माण करण्याचा. विश्वास बंगालच्या संस्कृती रक्षणाचा. मी ग्वाही देतो इथल्या तरुणांसाठी, शेतकऱ्यांसाठी, इथल्या भगिनी आणि मुलींच्या विकासासाठी आम्ही २४ तास काम करू. कष्ट करण्यात कोणताही कुचराई करणार नाही, असा विश्वास मोदी यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान, बॉलिवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. गेल्या बऱ्याच दिवसांपासून मिथुन चक्रवर्ती भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. अशातच आज अखेर अधिकृतपणे मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. त्यांनी कोलकाताच्या ब्रिगेड मैदानामध्ये पंतप्रधान मोदींच्या रॅलीमध्ये मंचावर भाजपचा झेंडा फडकावत पक्षप्रवेश केला. या दरम्यान बंगालचे भाजप अध्यक्ष दिलीप घोष आणि कैलास विजयवर्गीय मंचावर उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या