जोपर्यंत आज्ञा असेल तोपर्यंत आम्ही विरोधात बसणार - देवेंद्र फडणवीस

जोपर्यंत आज्ञा असेल तोपर्यंत आम्ही विरोधात बसणार - देवेंद्र फडणवीस

पुणे (प्रतिनिधि) / Pune - “जोपर्यंत आज्ञा असेल तोपर्यंत आम्ही विरोधात बसणार आहोत”, असं सूचक विधान विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलं आहे. महाराष्ट्रातील सत्ता बदलाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी हे विधान केल्याने राजकीय तर्क वितर्कांना उधाण आले आहे.

देवेंद्र फडणवीस आज पुण्यात होते. एका कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना केंद्रात विस्तार झाला आहे. आता किती दिवस विरोधात बसणार?, असा सवाल फडणवीसांना विचारण्यात आला. त्यानंतर त्यांनी हे सूचक विधान केलं. जितका काळ विरोधात बसायचं… म्हणजे आम्हाला आज्ञा असेल तोपर्यंत विरोधात बसणार, असं फडणवीस यांनी सांगितलं.

पंकजा मुंडे यांची भूमिका तीच भाजपची भूमिका

फडणवीस यांनी पंकजा मुंडे यांनी मांडलेल्या भूमिकेचं यावेळी स्वागत केलं. मी असो की डॉ. भागवत कराड, आम्ही दोघेही मुंडे साहेबांमुळे तयार झालेले कार्यकर्ते आहोत. पंकजाताईंनी मांडलेली भूमिका हीच भाजपाची भूमिका आहे. राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष आणि नंतर स्वत: हीच आमची सर्वांची कार्यपद्धती आहे, असं फडणवीस म्हणाले.

संजय राऊत सर्वज्ञ नाही

शिवसेना नेते संजय राऊत यांनी सहकार खात्यावरून भाजपवर टीका केली होती. त्याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, राऊतांना सर्व गोष्टी माहीत आहेत, असं तुम्हाला का वाटतं? तेच पंडित आहेत, त्यांनाच सर्व काही समजतं. त्यांनाच संविधान समजतं हा तुमचा गैरसमज आहे. इतके वर्ष एनसीडीसीच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये केंद्राने राज्याला दिले. ते कशाच्या अखत्यारीत दिले होते? केंद्र सरकारने दूध संघापासून ते सूत गिरण्यांपर्यंत मदत केली, असं सांगतानाच राऊत, सर्वज्ञ आहेत असं तुम्हाला वाटत असेल, पण ते खरं नाहीये, असा चिमटा त्यांनी काढला.

बायकोनं मारलं तरी म्हणतील केंद्राचा हात

इंधन दरवाढीवरून सत्ताधारी आघाडीने केंद्र सरकारवर टीका केली आहे. त्यावरही फडणवीसांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. या सरकारमधील एखाद्या मंत्र्याला त्याच्या बायकोने मारलं तरी हे म्हणतील त्यात केंद्राचा हात आहे, असा टोला त्यांनी लगावला.

एकानेही शिवीगाळ केली नाही

विधानसभेत झालेल्या गोंधळावरही फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं. मी गेले २२ वर्ष सभागृहात आहे. कुणाला आवडो न आवडो पण माझंही एक महाराष्ट्रात रेप्युटेशन आहे. त्याआधारे सांगतो, भाजपच्या एकाही नेत्याने सभागृहात शिवीगाळ केलेली नाही. एकाही नाही. कोणीही नाही. बाचाबाची झाली. तीही डिस्टन्सवरून झाली. सेनेचे लोकं आमच्या अंगावर आले. शिवीगाळ करणारे कोण होते याची नीट माहिती घ्या. या लोकांची नावं मी योग्यवेळी सांगेल. पण एवढं सांगतो पीठासीन अधिकाऱ्याला शिवीगाळ करण्यात आली नाही. हे सर्व कपोलकल्पित आहे. भाजपविरोधात रचलेलं हे कुंभाड आहे, असा दावाही त्यांनी केला.

आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो

ओबीसींच्या प्रश्नांवर आमची लढाई यापुढेही सुरूच राहील. येत्या फेब्रुवारी महिन्यात तीन चतुर्थांश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व्हायच्या आहेत. तोपर्यंत सरकारला वेळ काढायचा आहे का, अशी शंका येते, असं सांगतानाच ओबीसी आरक्षणासंदर्भात 13 डिसेंबर 2019 ते 4 मार्च 2021 या संपूर्ण कालावधीत राज्य सरकारने काय कारवाई केली, हा प्रश्न विचारला का? कुणी कसेही वागले तरी विचारवंतांवर आम्ही टीका करीत नाही, असं ते म्हणाले. इम्पिरीकल डेटा गोळा करणे हे 4 महिन्यांचे काम आहे. हे काम सहज होऊ शकणारे आहे. मी हेच म्हटले की, जर तुम्हाला जमत नसेल तर मला सूत्र द्या, मी करून दाखवितो. आम्ही जे बोलतो ते करून दाखवितो, असंही ते म्हणाले.

सहकार खात्याचा महाराष्ट्राला फायदाच

केंद्रात सहकार खाते नव्हते, तर म्हणायचे केंद्र सरकार सहकाराला मारतं आहे. आता 70 वर्षांनी पहिल्यांदा सहकार खाते तयार झाले, तर म्हणतात की, सहकाराचा केंद्राशी काय संबंध?, असा दोन्ही काँग्रेसवर हल्ला चढवतानाच या खात्याच्या माध्यमातून महाराष्ट्राला मोठा लाभ होईल. केंद्रीय मंत्री अमित शाह राजकारणात येण्यापूर्वी सहकारात होते. गुजरातमध्ये सहकारात त्यांनी केलेले काम अतिशय मोठे आहे. त्यामुळे स्वाभाविकच हे खाते त्यांच्याकडे गेले, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com