विधान परिषद निवडणुकीसाठी आज मतदान; कोण मारणार बाजी?

महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये चुरस
विधान परिषद निवडणुकीसाठी आज मतदान; कोण मारणार बाजी?

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

गुप्त मतदानामुळे (Voting) विधान परिषद निवडणुकीत (Legislative Council Election) होणारी सर्वपक्षीय मतांची फाटाफूट, अपक्ष आणि छोट्या पक्षांनी बाळगलेले सोयीस्कर मौन तसेच धक्कादायक निकालाची परंपरा या पार्श्वभूमीवर आज, सोमवारी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत कोण बाजी मारणार आणि विजयापेक्षा कोणता उमेदवार पराभूत होणार? याची उत्सुकता महाराष्ट्राला (Maharashtra) लागली आहे....

राज्यसभा निवडणुकीचा निकाल लक्षात घेता भाजप (BJP) पुन्हा विजयाचा गुलाल उधळणार की आघाडी पराभवाची परतफेड करणार? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

राज्यसभा निवडणुकीचा निकाल ताजा असताना आघाडी आणि भाजपमध्ये विधान परिषदेचा सामना रंगला आहे. विधानसभा सदस्यांच्या मतदानाद्वारे विधान परिषदेवर निवडून द्यायच्या १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत.

त्यामुळे महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि भाजपमध्ये (BJP) आमदारांची मते खेचण्यासाठी जोरदार स्पर्धा सुरू आहे. या मतांच्या खेचाखेचीमुळे विधान परिषद निवडणूक रंगतदार बनली आहे.

राज्यसभेचा अनुभव लक्षात घेऊन काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शिवसेनेने (Shivsena) आपापल्या आमदारांची पंचतारांकित बडदास्त ठेवली आहे. निवडणुकीत मत बाद होऊ नये म्हणून आमदारांना मतदान प्रक्रियेची माहिती देण्यात आली आहे. शिवाय पसंती क्रमानुसार मतदान कसे करायचे याची रणनीती आघाडीकडून निश्चित झाल्यानंतर तशी माहिती आमदारांना देण्यात येणार आहे.

राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik), माजी मंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना न्यायालयाने (Court) विधान परिषद निवडणुकीत मतदान करण्यास परवानगी नाकारली आहे.

बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिज ठाकूर परदेशात असल्याने त्यांच्या मतदानाबाबत साशंकता आहे. शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे विधानसभेची एक जागा रिक्त आहे. त्यामुळे विधान परिषदेसाठी २८४ आमदार मतदान करतील, असा अंदाज आहे.

विधान परिषदेसाठी वैध मतदानावर उमेदवाराच्या विजयाचा कोटा निश्चित होणार आहे. त्यामुळे आघाडीकडून काटेकोर नियोजन सुरू असून भाजपच्या रणनितीला शह देण्याचा आघाडीचा प्रयत्न आहे.

भाजपने पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या अचूक नियोजनावर राज्यसभा निवडणुकीत आघाडीला अस्मान दाखविले. यावेळीही विजय खेचून आणून आघाडीला धक्का देण्याचा भाजपचा मनसुबा असून तसे नियोजन विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडून सुरू आहे.

आजच्या विधान परिषद निवडणुकीत आघाडी आणि भाजपला किती आमदारांचे समर्थन आहे, याचा अंदाज निकालातून येणार आहे. त्यामुळे मते मिळविण्यासाठी दोन्ही बाजूने सर्वशक्तीनिशी प्रयत्न सुरू असून या प्रयत्नात आघाडीचे पहिल्या आणि दुसऱ्या तर भाजपच्या तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या क्रमांकाचे उमेदवार अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विधान परिषद निवडणुकीतील उमेदवार

भाजप : प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड.

शिवसेना : सचिन अहिर, आमशा पाडवी.

राष्ट्रवादी काँग्रेस : रामराजे नाईक निंबाळकर, एकनाथ खडसे.

काँग्रेस : चंद्रकांत हंडोरे, भाई जगताप.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com