Friday, April 26, 2024
Homeराजकीयविखे पाटलांनी दिली मुरकुटेंना भाजपाची ऑफर

विखे पाटलांनी दिली मुरकुटेंना भाजपाची ऑफर

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

भाजपा शिवाय देशाला पर्याय राहिलेला नाही. त्यामुळे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी भाजपात यावे, अशी ऑफर

- Advertisement -

देतानाच, महाविकास आघाडी सरकार मधील जिल्ह्यातील तिन्ही मंत्री कामकाजात अपयशी ठरत असल्याने जिल्ह्याला तीन मंत्रिपदे असूनही जिल्ह्यातील प्रश्न सुटत नाहीत, असा आरोप भाजपाचे माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी टाकळीभान येथे आयोजित विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी केला. अध्यक्षस्थानी माजी आमदार भानुदास मुरकुटे होते.

माजी सभापती नानासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली टाकळीभान येथे विविध विकास कामांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी टाकळीभान येथे करण्यात आले होते. प्रमुख मार्गदर्शन करताना आ.विखे म्हणाले, भाजपा हा देशातील सर्वात मोठा पक्ष झालेला आहे. त्यामुळे देश विकास साधत आहे. भाजपा शिवाय आता दुसरा पर्याय राहिलेला नसल्याने माजी आ. मुरकुटे यांनीही आता भाजपात यावे अशी खुली ऑफर त्यांनी मुरकुटे यांना दिली.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या अकार्यक्षमतेवर विखे पाटील यांनी टिकास्र सोडले. महाविकास आघाडी सरकारचे मंत्री जनतेकडे पहायला तयार नाहीत. आधिकार्‍यांच्या बदल्या करण्याचा सपाटा सध्या लावलेला आहे.

बदलीचे रेट ठरलेले आहेत. त्यामुळे केवळ अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात ते धन्यता मानीत आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये जिल्ह्यातील तीन मंत्री आहेत. अतिवृष्टीने शेती पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. मंत्र्यांनी पंचनाम्याचे केवळ आदेश दिलेले आहेत. पंचनामे झालेले असले तरी शेतकर्‍यांच्या पदरात भरपाईचे माप अद्याप टाकलेले नाही.

तीनही मंत्री कामकाजात सपशेल अपयशी ठरले आहेत. जनतेकडे पहायला व प्रश्न सोडवायला त्यांच्याकडे वेळ नसल्याने तीन मंत्री असुनही जनतेला फायदा होत नाही अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

यावेळी माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी तालुक्यातील भविष्यात निर्माण होणारा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी विखे पाटील यांनी प्रयत्न करावा. कमालपूर येथे मराठवाड्याला जोडला जाणारा गोदावरी नदीवरील पूल होण्यासाठी विखे पाटलांनी लक्ष घालावे अशी मागणीही मुरकुटे यांनी यावेळी केली.

यावेळी माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, माजी सभापती दीपक पटारे, पं.स.च्या सभापती संगिता शिंदे, जि.प.सदस्य शरद नवले, संगिता गांगुर्डे, पं.स.चे उपसभापती बाळासाहेब तोरणे, बाजार समितीचे उपसभापती नितिन भागडे, माळवाडगाचे सरपंच बाबासाहेब चिडे, गिरधर आसने, सचिव किशोर काळे आदी मान्यवर उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या