शिर्डीच्या नगरसेवक अपहरण प्रकरणात विजय कोते आरोपी
राजकीय

शिर्डीच्या नगरसेवक अपहरण प्रकरणात विजय कोते आरोपी

साई निर्माण ग्रुप व माझ्याविरुद्ध राजकीय षडयंत्र : विजय कोते

Arvind Arkhade

लोणी|वार्ताहर|Loni

एक वर्षांपूर्वी शिर्डीच्या नगराध्यक्ष निवडीच्यावेळी नगरसेवक दत्तात्रय कोते यांचे अपहरण झाले होते. या प्रकरणात चार आरोपींना अटक झाली. मात्र या प्रकरणात साई निर्माण ग्रुपचे अध्यक्ष विजय कोते यांना आरोपी करण्यात आल्याने खळबळ उडाली. रविवारी ते लोणी पोलीस ठाण्यात स्वतः हजर झाले. त्यापूर्वी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना माझ्याविरुद्ध हे मोठे राजकीय षडयंत्र असल्याचे सांगताना लवकरच सत्य समोर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

27 जून 2019 रोजी शिर्डीच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक होती. आपलाच नगराध्यक्ष व्हावा म्हणून अनेक गट प्रयत्नशील होते. त्यातच मनसेचे एकमेव नगरसेवक दत्तात्रय शिवाजी कोते यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी सर्वांनी फिल्डिंग लावली होती.

अचानक 24 जून रोजी मध्यरात्री बाभळेश्वर येथून दत्तात्रय कोते यांचे अज्ञात व्यक्तींनी अपहरण केले. त्यांना पहाटे सोनईजवळ सोडून देण्यात आले. कोते यांनी 25 जून रोजी सकाळी लोणी पोलीस ठाण्यात येऊन अपहरण झाल्याची फिर्याद दिली.

पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन गु.र.नं.165/2019 दाखल करून तपास सुरू केल्यानंतर श्रीरामपूर येथील आयाज शौकत मिर्झा, अक्षय संजय गोसावी, नितीन भास्कर गायकवाड आणि पंकज बापू गायकवाड यांना अटक केली. या प्रकरणाला एक वर्ष पूर्ण झाले असताना पोलिसांना तपासात विजय तुळशीराम कोते यांचे नाव पुढे आले. पोलिसांनी दि.11 जुलै 2020 रोजी विजय कोते यांचे नाव या गुन्ह्यात समाविष्ट केले.

विजय कोते यांना याची माहिती मिळताच ते स्वतः रविवारी लोणी पोलीस ठाण्यात हजर झाले. त्यांना सोमवारी राहाता न्यायालयात हजर करण्यात आले. तत्पूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना विजय कोते यांनी सांगितले की, आपण पुणे येथे एका खाजगी कामासाठी गेलो होतो. शिर्डीतील अपहरण नाट्यात आपले नाव असल्याची माहिती मला आमचे नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील, खा. सुजय विखे पाटील व कैलासबापू कोते यांच्याकडून समजली.

त्यांच्या सुचनेनुसार आपण तातडीने लोणी पोलीस ठाण्यात स्वत:हून दाखल झालो. आजवर सिनेमातील अपहरणाचे कथानक बघितले होते आणि ऐकूनही होतो. मात्र केवळ अर्ध्या तासाच्या कपोलकल्पीत बनावट अपहरण नाट्यात राजकीय द्वेषातून आपले नाव आल्याने आश्चर्य वाटले.

मागील शिर्डी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या काळात घडलेले प्रकरण पुन्हा यावर्षी नगराध्यक्ष पदाच्या निवडीच्या काळातच उकरून निघते. यामागे मोठे राजकीय षडयंत्र असून केवळ साईनिर्माण ग्रुपचा नगराध्यक्ष होऊ नये यासाठीच हे कथानक रचले गेले आहे. कपोलकल्पीत अपहरण नाट्यात आपले नाव गोवले गेले आहे. साईबाबांवर आपली अपार श्रध्दा आहेच. परंतु न्यायदेवतेवर आपला शंभर टक्के विश्वास आहे. असे त्यांनी यावेळी सांगितले.

Deshdoot
www.deshdoot.com