Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्यावंचित बहुजन आघाडीने शिवसेनेशी युती करण्याबाबत घेतला 'हा' निर्णय

वंचित बहुजन आघाडीने शिवसेनेशी युती करण्याबाबत घेतला ‘हा’ निर्णय

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत घडवून आणलेल्या अभूतपूर्व फुटीनंतर पक्षात निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी नवे राजकीय मित्र जोडू पाहणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसोबत आघाडी करण्यास वंचित बहुजन आघाडीने तयारी दाखवली आहे.

- Advertisement -

मात्र, वंचित बहुजन आघाडीला ( Vanchit Bahujan Aaghadi ) महाविकास आघाडीचा भाग बनविणार आणि ही चार पक्षीय आघाडी करून निवडणूक लढवणार की शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र मिळून निवडणुका लढवणार याबाबत स्पष्टता करावी, अशी मागणी वंचितने केली आहे. या बाबतीत शिवसेनेकडून निर्णय आल्यानंतर आघाडीबाबत पुढच्या टप्प्याची चर्चा सुरु होईल, अशी माहिती वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी मंगळवारी दिली.

प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर एकत्र आले होते. त्यावेळी ठाकरे यांनी देशातील लोकशाही वाचविण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला वंचितने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

वंचित बहुजन आघाडीची शिवसेना सोबत युती करण्याबद्दल चर्चा सुरु आहे. या बाबतीत वंचितच्या वतीने आम्ही आमचा होकार कळवला आहे. आमच्या वतीने पक्षाचे राज्य समितीचे सदस्य महेंद्र रोकडे, मुंबई प्रदेश अध्यक्ष अबुल हसन आणि वंचित बहुजन युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष नीलेश विश्वकर्मा यांची शिवसेना नेते सुभाष देसाई तसेच शिवसेनेचे काही खासदार यांच्या बरोबर दोन बैठका झाल्या आहेत. त्यात युती संबंधी सकारात्मक चर्चा झाली, असे ठाकूर यांनी आज सांगितले. आघाडी करण्याबाबत देसाई यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आहे. दोघांच्या दोन बैठका झाल्या असून युती संबंधी सकारात्मक चर्चा झाली आहे, असे रेखा ठाकूर यांनी सांगितले.

दरम्यान, शिवसेना आणि वंचित आघाडीची युती झाल्यास अथवा वंचित महाविकास आघाडीचा भाग झाल्यास राज्यातील राजकारणाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे उद्धव ठाकरे यांना मराठवाड्यात आणि विदर्भात मोठा फटका बसला. या दोन विभागातील शिवसेनेचे आमदार शिंदे यांच्यासोबत गेले. विदर्भ आणि मराठवाड्यात आंबेडकर यांची निर्णायक ताकद आहे. त्यामुळे शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आल्यास त्याचा फायदा शिवसेना आणि वंचितला होऊ शकतो.

- Advertisment -

ताज्या बातम्या