राष्ट्रवादीमध्ये 'ठोंबरे' गट नाही, चिकटगावकरांचे नेतृत्व मान्य : भाऊसाहेब ठोंबरे

ठोंबरे- चिकटगावकर मनोमिलन होणार? पंकज ठोंबरे विधानसभा लढवणार?
राष्ट्रवादीमध्ये 'ठोंबरे' गट नाही, चिकटगावकरांचे नेतृत्व मान्य : भाऊसाहेब ठोंबरे

वैजापूर | प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत मी मागील चाळीस वर्षापासून काम करत आहे. त्यामुळे माझा पुतण्या व जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे हा काँग्रेस मधून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये गेल्यानंतर मीही काँग्रेस पक्ष सोडला आहे.

मात्र त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये कुठलाही ठोंबरे गट नसून माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांचे नेतृत्व आम्हाला मान्य आहे अशी प्रांजळ कबुली ज्येष्ठ नेते भाऊसाहेब ठोंबरे यांनी दिली. भाऊसाहेब ठोंबरे व माजी जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे यांनी शुक्रवारी त्यांच्या संपर्क कार्यालयात आपल्या पत्रकार परिषदेत ही भूमिका स्पष्ट केली.

पंकज यास राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये आणण्यात आमदार सतीश चव्हाण यांचा कुठलाही हात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे ठोंबरे विरुद्ध चिकटगावकर या वादावर आता पडदा पडला आहे. जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे यांनी काँग्रेसकडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतल्यानंतर चिकटगावकर यांनी विरोधाची भूमिका घेत पक्ष सोडण्याची तयारी दर्शवल्याने पक्षांतर्गत गटबाजी उघड होत असताना ठोंबरे यांनी ही भूमिका घेतल्याने दोघांचे मनोमिलन होणार का कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब भोसले, दत्तू त्रिभुवन,विनायक गाढे, एल. एम पवार, अमृत शिंदे आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. ठोंबरे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत मी १९८० पासून काम करत आहे. तालुक्यातील एक सहकारी साखर कारखाना १९९५ मध्ये ताब्यात घेतल्यानंतर कर्मचाऱ्यांचे पगार, शेतकऱ्यांचे देणे याबाबत पैसा पडू नये यासाठी शरद पवार यांनी कारखान्याला मोठी मदत केली. त्यामुळे आमचे संबंध अतिशय जुने असून भाऊसाहेब तात्या यांचे मोठे बंधू व माजी आमदार दिवंगत कैलास पाटील यांच्यासोबत काम केले आहे. त्यामुळे नव्याने राजकारण करत असलेल्या मंडळींच्या आरोपात अजिबात तथ्य नाही असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांना पंकजच्या प्रवेशाला का विरोध आहे हे आम्हालाही समजत नसल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले.

तर पंकज विधानसभेची निवडणूक लढवेल.

पक्ष श्रेष्ठींनी आदेश दिल्यास पंकजला विधानसभेची निवडणूक लढवावी लागेल किंवा त्यांनी तसे आदेश न दिल्यास पक्षाने दिलेल्या उमेदवाराचे काम करावे लागेल असे सांगत ठोंबरे यांनी पंकज यासही राजकीय महत्त्वकांक्षा आहे असे नमूद केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com