UP Elections : भाजपाला मोठा धक्का! योगी सरकारमधील आणखी एका मंत्र्याचा राजीनामा

UP Elections : भाजपाला मोठा धक्का! योगी सरकारमधील आणखी एका मंत्र्याचा राजीनामा

दिल्ली | Delhi

उत्तर प्रदेशसह इतर पाच राज्यांच्या निवडणुकांचं (Assembly Election 2022) बिगुल वाजलं आहे. उत्तर प्रदेशकडे (UP Assembly Election 2022) सर्व देशाचं लक्ष लागले आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आणखी एक धक्का बसला आहे. मंत्रिमंडळातील आणखी एका मंत्र्याने आपला राजीनामा दिला आहे.

योगी सरकारमधील मंत्री दारा सिंह चौहान (Dara Singh Chauhan) यांनी आता मंत्रीपदाचा राजीनामा सोपवला आहे. याआधी कालच मंगळवारी स्वामी प्रसाद मौर्य यांनी पदाचा राजीनामा देत भाजप पक्षाला रामराम ठोकला होता. त्यांच्याशिवाय आणखी तीन आमदारांनी काल पक्षाला अलविदा केला आहे.

'मी योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमध्ये चांगलं कार्य केलंय. वन, पर्यावरण आणि उद्यानमंत्री म्हणून संबंधित विभागात मोलाचं योगदान दिलं. मात्र, दलित, वंचित आणि मागासवर्ग, शेतकरी आणि बेरोजगारी संदर्भातील सरकारने उपेक्षा केली आहे. तसेच, मागास आणि ओबीसी प्रवर्गाकडे सरकारने अक्षम्य दुर्लक्ष केल्याचं दिसून आलेय. त्यामुळे, मी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देतोय,' असे दारासिंह यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे.

कोण आहे दारा सिंह चौहान?

दारा सिंह चौहान हे देखील भाजपामध्ये येण्यापूर्वी बहुजन समाज पक्षाचे (बसपा) नेते होते. २०१५ मध्ये त्यांनी बसपा सोडून भाजपामध्ये प्रवेश केला. तीन वेळा खासदार राहिलेल्या चौहान यांना भाजपाचे तत्कालीन अध्यक्ष अमित शाह यांनी भाजपाचे सदस्यत्व दिले होते. चौहान यांना ओबीसी मोर्चाचे अध्यक्षही करण्यात आले होते. मधुबन विधानसभा मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर त्यांना योगी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री करण्यात आले होते. मात्र आता निवडणुकांच्या तोंडावर त्यांनी राजीनामा दिला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com