Friday, April 26, 2024
Homeराजकीयशिवसेनेकडून विधानपरिषदेवर उर्मिला मातोंडकर ?

शिवसेनेकडून विधानपरिषदेवर उर्मिला मातोंडकर ?

मुंबई | Mumbai

राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर नियुक्त केल्या जाणाऱ्या १२ जागांसाठी महाविकास आघाडीने नावे निश्चित केल्याचे समजते आहे. विशेष बाब म्हणजे शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी देण्याचा विचार सुरु असल्याची माहिती सूत्रांकडून समजते आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासाठी फोनवरुन उर्मिला मातोंडकर यांच्याशी बातचीत केल्याचे कळते. कंगना रनौत आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात नुकत्याच झालेल्या संघर्षात कंगनाला उर्मिला मातोंडकर यांनी चांगलेच फैलावर घेतले होते.

- Advertisement -

विधानपरीषदेच्या राज्यपाल नियुक्त जागेसाठी काँग्रेस पक्षाकडून उर्मिला मातोंडकर यांना विचारण्यात आले होते. परंतू, विधानपरिषदेत आपल्याला स्वारस्य नसल्याचे उर्मिला यांनी काँग्रेसला कळवल्याचे समजते. त्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच स्वत: उर्मिला यांना फोन केल्याच्या वृत्ताने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. राज्यात सत्तेवर असलेले महाविकासआघाडी सरकार आणि राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे सख्य आता महाराष्ट्राला ठाऊक झाले आहे. त्यामुळे राज्यपाल कोट्यातून विधानपरिषदेवर पाठविण्यात येणाऱ्या 12 नावांवर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष जोरदार खल करताना दिसत आहेत. उर्मिला या अभिनय क्षेत्रातील असल्यानं त्यांच्या नावाला राज्यपालांकडून आक्षेप घेतला जाण्याचीही शक्यता कमी आहे.

दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांना उर्मिला मातोंडकर यांच्याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, ‘उर्मिला मातोंडकर यांच्याबाबत प्रसारमाध्यमातून मिही चर्चा ऐकतो आहे. परंतू , त्याबाबत मला माहिती नाही. राज्यपाल नियुक्त आमदारांची नावे ठरवण्याचे सर्वाधिकार कॅबिनेटला असतात. कॅबिनेटने हे अधिकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहेत’, असे राऊत यांनी म्हटले आहे.

उर्मिला मातोंडकर यांनी २०१९ साली काँग्रेसच्या तिकिटावर उत्तर मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यांच्या झंझावाती प्रचाराची चर्चाही झाली होती. मात्र, त्यावेळी भाजपचे गोपाळ शेट्टी यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. कालांतरानं काँग्रेसमधील अंतर्गत वादातून त्या पक्षातून बाहेर पडल्या. काही काळापूर्वी अभिनेत्री कंगना रनौत हिने महाराष्ट्र, मुंबई, मुंबई पोलीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले होते. त्यानंतर उर्मिला मातोंडकर यांनी तीव्र परंतू संयत भाषेत कंगना रनौत हिचा समाचार घेतला होता. त्यातच उर्मिला मातोंडकर यांचा मराठी चेहरा, बॉलिवूडमधील वलय या गोष्टी पाहता उर्मिला यांना शिवसेना संधी देण्याची शक्यता नाकारता येत नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या