चोरावर मोर करायला संजय राऊत सक्षम - उर्मिला मातोंडकर

चोरावर मोर करायला संजय राऊत सक्षम - उर्मिला मातोंडकर

पुणे (प्रतिनिधि) / Pune - “संजय राऊत हे अनेक लोकांच्या अनेक टीका सहन करून त्यांच्यावर चोरावर मोर करायला भरपूर सक्षम आहेत. त्यावर मी काय बोलू… ते रॉक स्टार आहेत,” असं उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) म्हणाल्या.

फादर स्टॅन स्वामी मृत्यू प्रकरणावरून भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी टीका केली. चित्रा वाघ यांनी एक ट्वीट करून संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. “सामनाचे कार्यकारी संपादक तसेच सोनिया सेनेचे प्रवक्ते संजय राऊतजी, हे फादर स्टॅन सामी जे कोर्टाच्या निर्देशानुसार नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपामुळे कारागृहात होते; त्यांचा मृत्यू झाल्याने प्रचंड अस्वस्थ झालेले दिसतात,” अशी टीका केली होती. त्याबाबत विचारले असता त्यांनी वरील उत्तर दिले.

उर्मिला मातोंडकर यांच्या हस्ते आज शिवसेनेच्या शिवसंपर्क मोहिमेचं उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या. ‘सामना’बाबत शिवसेना नेते संजय राऊतच अधिक माहिती देतील. तो त्यांना अधिकार आहे. दुसऱ्या कुणाला अधिकार नाही. शिवसेनेत नसलेल्या लोकांनी तर त्यावर बोलूच नये, अशा शब्दात त्यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा समाचार घेतला.

विधान परिषदेतील बारा आमदारांच्या नियुक्तीचा निर्णय राज्यपालांकडून अद्यापही करण्यात आलेला नाही. त्यावर मातोंडकर म्हणाल्या, “तो एक वेगळाच विषय आहे. राज्यपाल ती यादी मान्य करतील, तेव्हा करतील. त्यामुळे आपलं काम थांबत नाही. तसेच मी एखादी गोष्ट डोक्यात ठेवून राजकारणात आलेली नाही. जर राज्यपालांकडून करण्यात येणाऱ्या नियुक्तीवर बोलायचं झाल्यास तोंडावर मास्क आहे, तोच बरा आहे”, असं म्हणत त्यांनी अधिकच भाष्य करणं टाळलं.

ईडीच्या कारवाया वेळा साधून होत आहेत. त्यावर प्रश्न निर्माण होत आहे. ठरावीक पक्ष आणि लोकांवरच कारवाया होत आहेत. हे जास्तच साधून आलंय, अशी टीका उर्मिला यांनी केली.

शिवसेना नेते संजय राठोड यांच्या मंत्रिमंडळातील पुनरागमनाच्या चर्चा आहेत. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना मातोंडकर म्हणाल्या, राठोड मंत्रिमंडळात येणार का? या चर्चा केवळ प्रसारमाध्यमात आहेत. तुम्ही लोकं यावर चर्चा करत आहात.

नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या मदतीवरही उर्मिला मातोंडकर यांनी निशाणा साधला. “जेव्हा २०१९ मध्ये राज्यात पूर आला, तेव्हा मी सांगली, सातारा आणि कोल्हापूर येथे चार दिवसाच्या दौर्‍यावर गेले होते. ही गोष्ट मी प्रसार माध्यमांना देखील सांगितली होती आणि त्यांनी माझं काम पाहिलं आहे. हल्लीचे नेते एक केळी वाटतात आणि चार फोटो काढतात”, अशा शब्दात त्यांनी चमकोगिरी करणाऱ्या नेत्यांना सुनावलं.

यावेळी त्यांना स्वबळावर निवडणुका घेण्याबाबत विचारण्यात आलं. तेव्हा, निवडणुका स्वबळावर लढवाव्यात की एकत्रितपणे याचा निर्णय आमचं नेतृत्व घेईल, असं सांगतानाच शिवसंपर्क मोहिमेद्वारे शिवसेना घराघरात पोहोचणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

शिवसेना नेहमीच मदतीसाठी पुढे आली आहे. कोरोना काळात तर शिवसेनेने लोकांना मदत केली आहे. सेना सत्तेत आली त्यामुळे एक सुवर्ण पान उलगडलं गेलं. कोणत्याही नेतृत्वासाठी, पक्षासाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा असतो. पडत्या आणि वाईट काळात संघटन आणि नेतृत्व कसं आहे हे कळतं. तसंच ते सत्तेत असतानाही कळतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना संकटाची परिस्थिती यशस्वीपणे हाताळली. अशा काळात त्यांच्या सारखा मुख्यमंत्री झाला नसता हे त्यांनी त्यांच्या कार्याने दाखवून दिलं आहे, असंही त्यांनी सांगितलं. कोरोनाला पळवून लावलं असं देशभरातील नेते सांगत होते. तेव्हा एकमेव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सातत्याने दुसऱ्या लाटेचा इशारा दिला होता. त्यांनी लोकांना विश्वासत घेतलं आणि त्यांना या लाटेविरोधात तयार केलं, असं त्या म्हणाल्या

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com