Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्यामहाविकास आघाडीचे ऐक्य मजबूत; भारत जोडो यात्रेतून विरोधकांना संदेश

महाविकास आघाडीचे ऐक्य मजबूत; भारत जोडो यात्रेतून विरोधकांना संदेश

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांनी चार महिन्यापूर्वी शिवसेनेत( Shivsena ) बंड करून महाविकास आघाडीला ( Mahavikas Aaghadi) सुरुंग लावल्यापासून महाविकास आघाडीच्या अस्तित्वाबाबत शंका उपस्थित होत असताना काँग्रेस नेते खा.राहुल गांधी ( Congress Leader MP Rahul Gandhi )यांच्या महाराष्ट्रातील भारत जोडो यात्रेच्या ( Bharat Jodo Yatra )निमित्ताने आघाडीचे ऐक्य मजबूत असल्याचे दाखवून दिले.

- Advertisement -

यात्रा सध्या महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यात पोहोचली असून आज या यात्रेत शिवसेना युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे सहभागी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे आदींनी राहुल गांधी यांच्यासोबत यात्रेत पायी अंतर कापत राज्यातील महाविकास आघाडी अद्याप कायम असल्याचा संदेश दिला. आगामी काळात भाजपच्या विरोधातील राजकीय लढाई एकत्र लढली जाईल, असे संकेत यातून मिळाले आहेत.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदावरुन पायउतार झाल्यापासून महाविकास आघाडीत फारसा ताळमेळ दिसत नव्हता. या तीनही पक्षाच्या समन्वय समितीची बैठक गेल्या कित्येक दिवसात झालेली नाही. राज्यात नजीकच्या काळात विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने मध्यंतरी तीनही पक्षाची बैठक बोलवली होती. मात्र, त्याला काँग्रेस आणि शिवसेनेकडून प्रतिसाद न मिळाल्याने ती रद्द करावी लागली होती.

शिवसेनेचे औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी काँग्रेसचे २२ आमदार फुटणार असल्याचा दावा केला होता. या दाव्यावर काँग्रेसने तीव्र प्रतिक्रिया दिल्यानंतर खैरे यांनी आपले विधान मागे घेतले होते. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भारत जोडो यात्रेच्या तोंडावर शिवसेना हा काँग्रेसचा नैसर्गिक मित्र नसल्याचे विधान करून खळबळ उडवली होती. त्यातून काँग्रेस आणि शिवसेनेत बेबनाव असल्याचे चित्र समोर आले होते. काँग्रेसने राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रण दिले होते. दोघांनी निमंत्रण स्वीकारले पण यात्रेत येण्याचे टाळले.

या पार्श्वभूमीवर काल, गुरुवारी राष्ट्रवादीचे जयंत पाटील, सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड भारत जोडो यात्रेत सहभागी झाले आणि राहुल गांधी यांच्यासोबत पायी चालले. आज आदित्य ठाकरे यांच्यासह विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधान परिषद सदस्य सचिन अहिर यांनी शिवसेनेच्या वतीने भारत जोडो यात्रेत सहभाग नोंदवत राहुल गांधी यांना पाठिंबा दिला. यातून महाविकास आघाडीच्या ऐक्यावर शिक्कामोर्तब झाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या