
नागपूर | Nagpur
भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आज (शनिवारी) साडेअकरा वाजण्याच्या सुमारात हा प्रकार घडला. पोलिस प्रशासन या प्रकरणाची कसून चौकशी करीत आहे.
प्राप्त माहितीनुसार, नागपुर येथील त्यांच्या कार्यलायत धमकीचे तीनवेळा फोन आले. सकाळी ११.२९ वाजता पहिला फोन आला. त्यानंतर आणखी दोन फोन आले. एक फोन ११.३५ वाजता तर तिसरा फोन हा १२.३२ वाजता आला. हा प्रकार झाल्यावर तेथील कर्मचाऱ्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.
यासंदर्भात नागपूर पोलीस झोन 2चे पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी माहिती दिली. 'गडकरी यांची सुरक्षा वाढवण्यात आली असून, ज्या ज्या ठिकाणी त्यांचे कार्यक्रम आहे. त्या ठिकाणी पर्याप्त सुरक्षा असणार आहे. सायबर टीमच्या मदतीने आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे', असं पोलीस उपायुक्त मदाने यांनी सांगितलं.
पोलिसांनी या घटनेचा वेगवान तपास करत धमकी देणाऱ्याचा फोन ट्रेस केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, हा फोन कर्नाटकच्या एका भागातून करण्यात आला होता. आता पोलिस फोन करणाऱ्याच्या मुसक्या आवळण्याच्या प्रयत्नांत आहेत.
दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील आज नागपुरातच असल्याची माहिती आहे. नागपूरमधीलच एका कार्यक्रमात आज दुपारी ते सहभागी झालेले आहेत. सकाळी आलेल्या धमकीच्या फोननंतर त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आलेली आहे.