‘नोटबंदी’मुळे वाढली बेरोजगारी

jalgaon-digital
2 Min Read

दिल्ली l Delhi

देशातील बेरोजगारीवरून माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

भाजप सरकारनं कोणताही विचार न करता घेतल्या गेलेल्या निर्णयामुळेच देशात बेरोजगारीचं प्रमाण वाढत आहे. तसंच असंघठित क्षेत्रही मोडकळीस आलं आहे, असं ते म्हणाले. तसंच मोदी सरकार राज्यांसोबत नियमितपणे विचार-विनिमय करत नसल्याचा आरोपही मनमोहन सिंग यांनी यावेळी केला.

केरळमध्ये काँग्रेस पक्षाशी जोडले गेलेले थिंक टँक राजीव गांधी डेव्हलेपमेंट स्टडिजच्या एका व्हर्चुअल संमेलनाचे उद्घाटन करताना मनमोहन सिंह बोलत होते. त्यांनी मोदी सरकार आणि त्यांच्या नीतिवर जोरदार हल्ला केला.

मनमोहन सिंग म्हणाले की, सरकार आणि रिझर्व्ह बँकेच्या तात्पुरत्या उपाययोजनांनी पतपुरवठा समस्या लपवता येणार नाही. या संकटाचा परिणाम लघु आणि मध्यम क्षेत्रावर होऊ शकतो. तसेच, देशात बेरोजगारी अधिक आहे आणि असंघटीत क्षेत्र ढासळलं आहे. हे संकट २०१६ मध्ये कोणत्याही विचारांशिवाय घेण्यात आलेल्या नोटबंदीच्या निर्णयामुळे उद्भवलं आहे, असंही त्यांनी नमूद केलं.

केरळच्या विकासासंबंधी बोलताना सिंग म्हणाले की, राज्याचे सामाजिक मापदंड उंच आहेत, पण भविष्यात राज्याला अन्य क्षेत्रावर देखील लक्ष देण्याची आवश्यकता आहे. राज्य सरकारला अनेक मुद्द्यांवर लक्ष द्यावे लागणार आहे. आरोग्य आणि शिक्षणावर लक्ष दिल्यामुळेच केरळचे लोक देश आणि जगातील सर्व भागात नोकरी करण्यास सक्षम झाले आहेत. असं सिंग म्हणाले. यावेळी त्यांनी केरळच्या विकासावर भाष्य केलं. तसंच भविष्यात या ठिकाणी अन्य पर्यायांवरही लक्ष देणं आवश्यक असल्याचं म्हटलं. तसेच संघवाद आणि राज्यांसोबत विचारविमर्श हे भारताच्या आर्थिक आणि राजकारणाची आधारशिला आणि संविधानाचे मूळ तत्वे आहेत. पण, सध्याचे सरकार याला महत्त्व देत नाही. असं ते म्हणाले.

दरम्यान, करोना संकटकाळातच महागाई आणि बेरोजगारी या मुद्यांवरून विरोधी पक्षांनी मोदी सरकारला घेरलं. अनेक ठिकाणी विरोधी पक्षांकडून महागाईच्या मुद्यावरून आंदोलनं केली जात आहेत. अशा वेळी डॉ. मनमोहन सिंह यांची टिप्पणी मोदी सरकारला आणखीन अडचणीत आणू शकते. सदर कार्यक्रमाचं आयोजन हे केरळमधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलं होतं. यावेळी सिंह यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडत सत्ताधारी भाजप सरकारच्या निर्णय आणि भूमिकांवर सडकून टीका केल्याचं पाहायला मिळालं.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *