मला वाटले हाेते भगवी शाल द्याल - उद्धव ठाकरे यांचा राज यांना टोला

मला वाटले हाेते भगवी शाल द्याल - उद्धव ठाकरे यांचा राज यांना टोला
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई / प्रतिनिधी
महाराष्ट्र निर्माण सेनेने हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेत महाराष्ट्र ढवळून काढण्याचा प्रयत्न चालवला असून त्याची रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार खिल्ली उडवली. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशदारी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या मागे शिवनेरी किल्ल्याच्या भव्य प्रतिकृतीचे उद्घाटन ठाकरे यांच्या हस्ते आज पार पडले. त्यावेळी 'मला वाटले होते संयोजक आज मला भगवी शाल देतील', असे टिपण्णी करत उद्धव यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला...

कामगार सेनेच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई, मंत्री अनिल परब, मंत्री आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे उपस्थित होते. प्रतिकृतीचे उद्घाटन उद्वव ठाकरे यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, 'महाराष्ट्र राकट देश आहे, त्याची ओळख विमानतळावर उतरणाऱ्या पाहुण्यांना झालीच पाहिजे. ही प्रतिकृती आपल्या राकटपणाचे दर्शन घडवेल'. ग्रामदैवत मुंबादेवीची प्रतिकृती इथे उभारल्या बद्दल मुख्यमंत्र्यांनी कामगार सेनेचे आभार मानले. विमानतळावर येणारा प्रवासी मुंबाईदेवीचे दर्शन घेऊन शहरात पाऊल ठेवणार असल्याबद्दल ठाकरे यांनी समाधान व्यक्त केले.

राज ठाकरे यांचे भगवी शाल पांघरलेले छायाचित्र सध्या सर्वत्र फिरते आहे. हिंदूजननायक अशी उपाधी राज ठाकरे यांना लावली जात आहे. त्या संदर्भात राज यांच्या नावाचा उल्लेख न करता उद्धव म्हणाले, 'अरविंदजी मला वाटले होते, तुम्ही मला येथे भगवी शाल द्याल, ठीक आहे. त्याची मला गरज वाटत नाही', असा चिमटा त्यांनी काढला.

'आपण १४ मे रोजी मुंबईत होणाऱ्या सभेत जे बोलायचे आहे ते सर्व बोलू, असे उद्धव यांनी यावेळी स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com