
नागपूर । प्रतिनिधी Nagapur
नागपूर भूखंड प्रकरणी (Nagpur plot case )न्यायालयाने दिलेले स्थगिती आदेशाचे प्रकरण गंभीर आहे. ज्या खात्याचा हा निर्णय आहे त्याचे मंत्री हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच आहेत. प्रकरण न्यायप्रविष्ट असताना सरकारने त्यात हस्तक्षेप केला ही बाब गंभीर आहे. आजपर्यत अशा प्रकरणात संबंधित खात्याचे मंत्री वा मुख्यमंत्री यांचा राजीनामा घेण्यात आला आहे. त्यामुळे यंत्रणेवर कोणाचाही दबाव नको म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम राहणार आहोत, असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी येथे सांगितले. राजा चुकत असेल तर ते सांगणे आमचे कर्तव्यच आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
महापुरूषांबद्दल अवमानकारक वक्तव्ये करणा-या राज्यपालांनी खरे तर स्वत:हूनच रामराम करायला पाहिजे होता. मात्र अजूनही ते पदावर आहेत. ते स्वत:हून गेले नाही तर आम्ही जे करायचे ते करू, असेही ठाकरे म्हणाले. कर्नाटक सीमाप्रश्नी राज्य सरकारने कठोर भूमिका घ्यायला हवी, अशी मागणीही त्यांनी केली.
हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने येथे आलेल्या उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन नागपूर भूखंड वाटप प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले. यावेळी ठाकरे म्हणाले, या भूखंड वाटपास नागपूर सुधार प्रन्यासच्या तत्कालीन अध्यक्षांनी नकार दिला होता. तरीही १६ जणांच्या नावांना मंजुरी देण्यात आली. आता नागपूर खंडपीठाने जो स्थगिती आदेश दिला तो गंभीर आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या सहजतेने आणि लीलया हा विषय सांगितला, तो इतका सहज असता तर हे प्रकरण इतकी वर्षे का चालले असते? कदाचित आता चंद्रशेखर बावनकुळे आणि चंद्रकांत पाटील यांची इच्छा पूर्ण होईल, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला.
राज्यपालांनी स्वत:हूनच रामराम करायला हवा
महापुरूषांबाबत अवमानजनक वक्तव्ये केल्यानंतर राज्यात जो असंतोष निर्माण झाला तो पाहता राज्यपालांनी खरेतर स्वत:हूनच रामराम करायला हवा होता. मात्र ते केंद्राला पत्र लिहून विचारत आहेत. राज्यपाल जर स्वत:हून जात नसतील तर आम्हाला जे करायचे ते करू, असेही ठाकरे म्हणाले.
सीमाप्रश्नावर मुख्यमंत्री म्हणतात त्यावेळी त्यांनी लाठया खाल्या होत्या. मात्र ते वळ आता विरले आहेत. पण सीमाभागातील जनता अद्याप लाठ्या खाते आहे त्याचे काय? केंद्रीय ग़हमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर आता कालपरवापर्यंतही अत्याचार झाल्याच्या बातम्या येत आहेत. सरकार काय करते आहे? असा प्रश्न ठाकरे यांनी केला.
मुंबईतील आघाडीचा महामोर्चा हा नॅनो मोर्चा असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यावरबोलताना उद्धव ठाकरे यांनी आमचा मोर्चा हा फडणवीस साईझ मोर्चा होता, असा टोला लगावला.