LIVE : उद्धव ठाकरेंच्या टार्गेटवर कोण? विरोधकांना काय उत्तर देणार? पाहा लाईव्ह

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ( MNS ) भोंग्यांवरून तापवलेले राजकीय वातावरण, राणा दाम्पत्याने हनुमान चालिसावरून दिलेले आव्हान आणि भाजप नेत्यांकडून होणारे राजकीय हल्ले या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray) प्रथमच खुल्या मैदानात शिवसैनिकांशी संवाद साधत आहेत.

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

आम्हाला देवळात घंटा बडवणारा हिंदू नको, तर अतिरेक्यांना बडवणारा हिंदू पाहिजे, असे शिवसेनापक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणायचे. आता फडणवीस म्हणतात आम्हाला गधादारी म्हणतात. आमचे हिंदुत्व गदाधारी आहे. गध्यांना आम्ही अडीच वर्षांपूर्वीच सोडले आहे, अशा शब्दांत शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Shiv Sena chief Uddhav Thackeray )फडणवीसांना सणसणीत टोला लगावला.

राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बीकेसीतील जाहीर सभेत विरोधी पक्ष असलेल्या भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेतला.

महाराष्ट्रात राहून महाराष्ट्र म्हणजे काय हे ज्यांना समजले नाही त्यांच्यासाठी आम्हाला बोलावे लागते. खोट्या हिंदुत्वाचा बुरखा घातलेला एक पक्ष आपल्यासोबत होता, तो आज देशाची दिशा भरकवटत आहे. मी मागे म्हटले होते की आमचे हिंदुत्व घंटाधारी नाही तर गदाधारी आहे, त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले शिवसेनेचे हिंदुत्व गधादारी आहे. आमचे तुमच्यासोबत जुने फोटो बघून तुमचा तसा गैरसमज होत असेल. मात्र आम्ही अडीच वर्षांपूर्वीच गध्याला सोडून दिले आहे. शेवटी गाढव ते गाढवच, गाढवाने आम्हाला लाथ मारण्याआधी आम्हीच त्यांना लाथ मारली,’ अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपला फटकारले आहे.

काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांची एक सभा झाली. त्यावेळी त्यांच्या तोंडातून एक वाक्य निघाले. मुंबई स्वतंत्र करू म्हणाले. मुंबई स्वतंत्र करू म्हणायला ती काय पारतंत्र्यात आहे का? असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला. मूळात भाजप आणि स्वातंत्र्यांचा संबंध काय? स्वातंत्र्यावेळी भाजप नव्हता. त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अस्तित्वात होता. पण त्यांचा स्वातंत्र्य लढाईत सहभाग नव्हता, असे ठाकरे म्हणाले.संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यावेळी जनसंघ अस्तित्वात होता. मात्र त्यांचा लढ्यात सहभागी नव्हता. उलट निवडणुकीत हेच जनसंघवाले सर्वात आधी जागांवरून भांडले आणि बाहेर पडले. शिवसेना 25 वर्षे युतीत सडली हे मी म्हटले होते. आता त्यांचा भेसूर आणि बेसूर चेहरा रोज पाहतोय. आम्ही अशा लोकांसोबत 25 वर्षे काढली यावर विश्वास बसत नाही, असेही ठाकरें म्हणाले.

पुरातत्व विभाग औरंगजेबाच्या थडग्याचा सांभाळ करतोय

2019 मध्ये मी मुख्यमंत्री झालो. प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे काम महाविकास आघाडी सरकार करत आहे. आम्ही आठ मंदिरं निवडली आहेत. केंद्रांतल्या पुरातत्व खात्याने त्यात खोडा घातला आहे. मंदिरांचा आम्ही जीर्णोद्धार करतोय, मंदिर दीर्घकाळ टिकेल यासाठी प्रयत्न करतोय. पुरातत्व विभाग औरंगजेबाच्या थडग्याचा सांभाळ करतोय, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

राज ठाकरेंचा खरपूस समाचार

मला एका शिवसैनिकाचा फोन आला होता. त्याने विचारलं तुम्ही लगे रहो मुन्ना भाई हा सिनेमा बघितला का? त्यावर मी विचारले का रे...तर तो म्हणाला की तशी एक केस आपल्याकडे आहे.सध्या एकजण भगवी शाल पांघरून फिरत आहे. आपणच बाळासाहेब असे त्याला वाटू लागले आहे. पण मुन्नाभाई चित्रपटाच्या शेवटी संजय दत्तला कळते की आपल्या डोक्यात केमिकल लोचा झाला आहे. तसेच यांचेही झाले आहे. त्यामुळे यांना फिरू द्या. कधी ते मराठीचा मुद्दा घेऊन फिरतील. कधी हिंदूंचा मुद्दा घेऊन येतील. त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज यांचे नाव न घेता टीकास्त्र सोडले आहे.

टीनपाट लोकांना सुरक्षा

काश्मिरी पंडित राहुल भट याला कार्यालयात घुसुन गोळ्या घातल्या. काय करायचं आपण तिथं हनुमान चालीसा म्हणायचं का? काश्मिरी पंडितांना सुरक्षा द्यायला हवी होती, असें उद्धव ठाकरे म्हणाले. टीनपाट लोकांना वाय प्लस, झेड प्लस सुरक्षा देत आहात. गळक्या टीनपाटांचा तुम्हाला काय उपयोग आहे., अशा पद्धतीचा कारभार सुरु आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

Related Stories

No stories found.