मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, “मराठीनंतर हिंदुत्वाचा खेळ सुरु करुन...”

मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, “मराठीनंतर हिंदुत्वाचा खेळ सुरु करुन...”

मुंबई | Mumbai

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त एका वृत्तवाहिनीच्या विशेष कार्यक्रमात मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे आणि मनसेवर जोरदार निशाणा साधला.

कधी मराठीचा, कधी हिंदुत्वाचा खेळ

'मी अशा खेळाडूंकडे लक्ष देत नाही. हे खेळाडू कधी कोणत्या मैदानात खेळत कोणते खेळ करतात हे आतापर्यंत लोकांनी अनुभवलं आहे. कधी मराठीचा खेळ, कधी हिंदुत्वाचा खेळ कधी याचा खेळ असे खेळाडू असतात त्यांचा मी अपमान करु इच्छित नाही. इतर जे काही खेळ करतात डोंबारी वगैरे त्यांचा अपमान करु इच्छित नाही असे खेळ महाराष्ट्राच्या जनतेने पाहिले आहेत,' अशी बोचरी टीका करत खडेबोल सुनावले आहेत.

करमणूक फुकट मिळत असेल तर का नाही पाहायची

'गेल्या दोन वर्षांपासून सारे काही बंद होते. आता कुठे जनजीवन रुळावर येत आहे, अशा परिस्थितीत फुकटात करमणूक पाहायची असेल तर ती का नाही पाहायची,' असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

भोंगेधारी, पुंगाधारी फार पाहिलेत

'शिवसेनेला हिंदुत्वाची ओळख लपवायची गरज नाही, मी विधानसभेतही हिंदुत्वाबाबत बोललोय. आता नवीन नवीन हे करून पाहू, ते करून पाहू, अशी मंडली आली आहे. मार्केटिंगचा जमाना आहे. हिंदुत्वाच्या गाजराची पुंगी वाजली तर वाजली असा विचार केला जातोय. असले भोंगेधारी पुंगीधारी खूप पाहिले आहे. त्यामुळे हिंदूंना सर्वकाही समजतं. कधीतरी आम्ही मराठी म्हणायचं आणि बाकीच्यांना हाकलून द्यायचं. ते फसल्यावर परत आम्ही हिंदू म्हणून त्यांना पुन्हा बोलवायचं, याला माकडचाळे म्हणतात, अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंवर केली आहे.

उत्तर प्रदेशात प्रेतंही नदीत फेकली होती

'भोंग्यांचा कोर्टाचा निकाल सर्वधर्मियांना लागू आहे. आपल्याला राज्याला पुढे न्यायचं आहे. उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री भोंगे काढतात तर महाराष्ट्रात का नाही असं म्हणतात. उत्तर प्रदेशात प्रेतंही नदीत फेकली होती. तेव्हा काम न करता हे करून लोकप्रिय होणार असतील तर त्यांचं त्यांना लखलाभ आहे. सर्वांनाच डेसिबलचं बंधन पाळावं लागेल, असं ते म्हणाले. अजानच्या मागून अजानतेपणानं जे चाललंय ते जाणून घ्या,' असं ते म्हणाले.

Related Stories

No stories found.