'कृषी कायदे' रद्द झाल्यानंतर काय म्हणालेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे? ​

'कृषी कायदे' रद्द झाल्यानंतर काय म्हणालेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे? ​

मुंबई l Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी आज (शुक्रवारी) सकाळी केंद्रानं (central govt) गेल्या वर्षी लागू केलेले तीन वादग्रस्त कृषी कायदे (farm law) मागे घेण्याची घोषणा केलीय. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात यासंबंधीची संवैधानिक प्रक्रिया पार पाडत हे कायदे मागे घेतले जातील, असंही मोदींनी म्हटलंय. या निर्णयाचं विरोधकांनी स्वागत केलं असून भाजपा नेते मात्र या निर्णयावर नाराज आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांनीही या निर्णयानंतर आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचं अभिनंदन केलं आहे.

कृषी कायदे मागे घेण्याची केलेली घोषणा म्हणजे सर्वसामान्य माणूस या देशात काय करू शकतो आणि त्याची ताकद काय असते याचे उदाहरण आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री यांनी म्हंटले आहे की, शेतकरी कायद्यांविरुद्ध देशभर विरोधाचं वातावरण होतं. आंदोलने सुरू होती आणि आजही सुरूच आहेत. आपल्या सर्वांचे पोट भरणाऱ्या अन्नदात्यांचे यात नाहक बळी गेले आहेत. पण या अन्नदात्याने आपली शक्ती दाखवून दिली, त्यांना माझं त्रिवार वंदन. जे वीर या आंदोलनात प्राणास मुकले त्यांना मी यानिमित्तानं नम्र अभिवादन करतो.

असो, आता सरकारला उपरती झाली, आणि हे कायदे मागं घेण्याची घोषणा पंतप्रधानांनी आज गुरू नानक जयंतीच्या निमित्तानं केली, त्याचं मी प्रथम तर स्वागत करतो. महाविकास आघाडीनं या कृषी कायद्यांविरुद्ध आपली भूमिका असल्याचं वारंवार सांगितलं आहे शिवाय मंत्रिमंडळात, विधिमंडळातदेखील या कायद्याच्या दुष्परिणामावर चर्चा केली आहे. केंद्राने यापुढं असे कायदे आणण्यापूर्वी सर्व विरोधी पक्ष तसेच संबंधित संघटना यांना विश्वासात घेऊन संपूर्ण देशाच्या दृष्टीने हिताचा निर्णय घ्यायला हवे म्हणजे आज जी नामुष्की ओढवली आहे असं होणार नाही. हे कायदे मागे घेण्याची तांत्रिक प्रक्रियाही लवकरात लवकर होईल अशी माझी अपेक्षा आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com