
मुंबई | Mumbai
शिंदे आणि ठाकरे यांचे आरोप-प्रत्यारोप आता महाराष्ट्राला नवीन राहिलेले नाहीत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली आहे. त्यांनी शिंदे यांना मख्खमंत्री म्हटलं आहे. मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते.
राज्यातील सध्याच्या विविध आंदोलनांवर बोलताना ते सतत देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करत होते. राज्यात सध्या अस्वस्थता, खदखद आहे. शेतकरी, बेरोजगार रस्त्यावर उतरले आहेत. लोक खूष नाहीत. त्याकडं फडणवीसांनी लक्ष द्यायला हवं. महाराष्ट्रातील खरे सूत्रधार तेच आहेत, असं राऊत म्हणाले.
त्यांच्या या विधानावर तुम्ही मुख्यमंत्र्यांना अनुल्लेखानं मारत आहात का, असा प्रश्न पत्रकारांनी केला. त्यावर ते म्हणाले, या राज्याला मुख्यमंत्री नाहीच आहे, मख्खमंत्री आहे. त्यांच्या हातात काहीच नाही, सगळी सूत्रं देवेंद्र फडणवीसांकडं आहेत. मुख्यमंत्री फक्त ४० खोकेबाज आमदारांना एकत्र ठेवण्याचं काम करतायत. अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली.
तसेच, या राज्यात सरकारच अस्तित्वात नाही. त्यामुळं सगळा गदारोळ, अराजक माजलंय. शेतकऱ्यांच्या मोर्चाचं वादळ ठाण्यापर्यंत येऊन पोहोचलंय. अराजकाची ठिणगी पडली तर महाराष्ट्रात वणवा पेटू शकतो. दिल्लीच्या इशाऱ्यावर राज्य करतायत. महाराष्ट्र लुटायला, खतम करायला निघालेत हे लोक. महाराष्ट्रात अस्थिरता माजवली जात आहे. त्या विरोधात महाविकास आघाडी रान उठवणार आहे. असं राऊत म्हणाले.
दरम्यान, भाजपा आमदार राहुल कुल यांच्यावर आज पुन्हा एकदा संजय राऊतांनी टीका केली. तसेच, या प्रकरणावरून त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं. विरोधकांना ईडी, सीबीआय, इओडब्ल्यूच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग केलं जातंय. त्याच्यावर बोला. राहुल कुलचं मी ५०० कोटींचं प्रकरण दिलं आहे. त्याच्यावर मुख्यमंत्री बोलतायत का? भाजपा आमदार राहुल कुल हे उपमुख्यमंत्र्यांचे खासमखास आहेत.
भीमा पाटणकर साखर कारखान्यातील ५०० कोटींच्या गैरव्यवहाराचं प्रकरण मी दिलं आहे. राहुल कुलला मुख्यमंत्री नाही, उपमुख्यमंत्री वाचवत आहेत. तुम्ही तुमच्या आसपास काय चाललंय ते पाहा आणि नंतर महाविकास आघाडीच्या कारभारावर बोट दाखवा, असा खोचक सल्ला संजय राऊतांनी दिला.