Sanjay Raut : ‘ठाकरे गट नाही, शिवसेना’, सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळणार; संजय राऊतांना खात्री

Sanjay Raut : ‘ठाकरे गट नाही, शिवसेना’, सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळणार; संजय राऊतांना खात्री

मुंबई | Mumbai

आज राज्याच्या राजकारणासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. गेल्या वर्षी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंडखोरी केली होती. शिवसेनेचे ४० आणि अपक्ष १० आमदार घेऊन एकनाथ शिंदे भाजप सरकारमध्ये सामील झाले होते. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी १६ आमदारांच्या आपात्रेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांकडे याचिका दाखल केली होती. आज या याचिकेची सुनावणी होत आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत म्हणाले, न्यायालयात आज काय होणार यावर मी बोलणार नाही. पण सत्य, न्याय याचा विजय होईल. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश स्पष्ट आहेत. आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात.. विधिमंडळातली फूट म्हणजे पक्षातली फूट नाही हे स्पष्ट केल्यामुळे चिन्ह व नाव याबाबत कोणताही संभ्रम असण्याचे कारण नाही. विधिमंडळातले आमदार किंवा संसदेतले खासदार सोडून गेले म्हणजे पक्ष फुटला हे मान्य करता येणार नाहीत असे न्यायालयाचे निर्देश आहेत. त्यामुळे शिवसेना एकसंघ आहे, एकसंघ राहील, असे संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, यावेळी एका पत्रकाराने ‘ठाकरे गट’ असा उल्लेख करून संजय राऊतांना प्रश्न विचारताच राऊतांनी ‘ठाकरे गट नाही, शिवसेना’ असे ठामपणे सांगितले. राहुल नार्वेकरांसमोर आमदार अपात्रतेची सुनावणी चालू असल्याबाबत विचारणा केली असता वेळकाढूपणा करत असल्याचे राऊत म्हणाले. सध्या वेळकाढूपणा चालला आहे. संविधान, कायदा, विधिमंडळाचे नियम याच्याशी केलेली बेईमानी आहे. गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकार चालवले जात आहे. सहा महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही सुनावणी घेतली जात नाही. त्यामुळे घटनाबाह्य सरकारला घटनात्मक पदावर बसलेले विधानसभेचे अध्यक्ष चालवतायत का? की चालवू देतात का? हा प्रश्न आहे, असे ते म्हणाले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com