उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यात जुंपली, वाचा कोण काय म्हणाले...

उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यात जुंपली, वाचा कोण काय म्हणाले...

मुंबई | Mumbai

भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले पुन्हा एकदा समोरासमोर आले आहेत. दोन्ही राजांमध्ये जुंपल्याने चर्चेचा विषय झाला आहे.

दिल्लीत केंद्राच्या विविध मंत्र्यांना भेटून फोटोसेशन करायचे, निवेदन देऊन शेकडो कोटी निधीचे आकडे पेपरमधून छापून आणायचे. पण, खरंच निधी आणला किती? असा सवाल करुन तुम्ही एवढे मोठे महान विकासपुरुष आहात तर, सातारा लोकसभेला तुमचा पराभव करून जनतेने तुम्हाला तुम्ही केलेल्या भरीव विकासाची पोचपावती का दिली? असा खोचक सवाल आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला आहे. तर शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना उदयनराजे भोसले यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

शिवेंद्रसिंहराजे भोसले काय म्हणाले होते?

''दिल्लीत केंद्राच्या विविध मंत्र्यांना भेटून फोटोसेशन करायचे. निवेदन देऊन शेकडो कोटी निधीचे आकडे पेपरमधून छापून आणायचे. पण, खरंच किती निधी आणला? आणि तुम्ही एवढे मोठे महान विकासपुरुष आहात तर, सातारा लोकसभेला तुमचा पराभव करून जनतेने तुम्हाला तुम्ही केलेल्या भरीव विकासाची पोचपावती का दिली? दुसऱ्याकडे बोट दाखवून स्वतः केलेली कुकर्मे लपत नाहीत. उदयनराजेंच्या भ्रष्ट कारभाराचा हिशोब सातारकर नक्कीच करतील.

शासनस्तरावर विविध विकासकामांसाठी पाठपुरावा करणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्यच आहे. त्यात नवीन असे काहीच नाही. नुसतं निवेदन देऊन फोटो काढायचा आणि भली मोठी आकडेवारी छापून बातमी प्रसिद्ध करायची, यातून कामे होतात का? तुम्ही १५ वर्ष खासदार होता त्यावेळी कार्यबाहुल्याच्या नावाखाली संसदेत एक दिवसही उपस्थित नव्हता. त्यावेळी का असे फोटोसेशन होत नव्हते. पालिकेच्या कार्यकालास चार वर्ष आणि आठ- दहा महिने उलटले, निवडणूक लागलीकीच बरी तुम्हाला केंद्रीय मंत्र्यांची आठवण होते. शेवटच्या महिन्यातच बरं विकासकामांचा पाठपुरावा सुरु होतो, मोठमोठ्या घोषणा होतात आणि याचेच कुतूहल सातारकरांना आहे. कास धरणाची उंची आमच्यामुळे वाढली हे तुम्ही पत्रकातून स्वतः कबुल केले त्यामुळे याबद्दल तुमचे आभार मानले पाहिजेत. पहिल्यांदा तुम्ही खासदार झाला त्यावेळी रेल्वेतून कराडला गेला. आपल्या माहुलीच्या रेल्वे स्टेशनवर मोठा स्टंट केला. पुढे कराड आणि माहुली या दोन्ही स्टेशनचा काय कायापालट केलात? केवळ शोबाजी केली, काहीतरी बदल झाला का? १५ वर्ष खासदार होता पण, केंद्र सरकारच्या माध्यमातून सातारा अथवा कराडवरून साधी नवीन, जलद रेल्वे तुम्हाला सुरु करता आली नाही.

सातारा पालिकेला जेवढा निधी मिळाला आहे त्यातील ९५ टक्के निधी हा राज्य सरकारच्या माध्यमातून मिळाला आहे. केंद्रातून काय मिळालं? साताऱ्याची हद्दवाढ जिल्हा परिषदेत कोणी अडवून ठेवली होती? तुमच्या राजकीय कार्यकर्त्यांच्या हट्टासाठी तुम्ही हा प्रश्न रखडून ठेवला होता त्याला राज्य सरकारकडून मंजुरी मिळवून मीच घेतली. हाच तुमचा विकास होता का? नुसतं मंत्र्यांना भेटून फोटो काढून आणि त्यांचा चहा पिऊन विकास होत नसतो हे सातारकरांना चांगलंच माहिती आहे. नुसतं फोटोसेशन करू नका सातारकरांसाठी खरंच काहीतरी आणा. ज्या बँकेच्या भ्रष्टाचाराची पुंगी सारखी वाजवताय ती बँक कायदेशीररित्या मर्ज केली. कोणाचा १ रुपयाही बुडवला नाही. उलट बँक मर्ज होऊ नये आणि लोकांची अडचण सुटू नये म्हणून शक्य तेवढे प्रयत्न तुम्ही केले पण, तुम्हाला यश आले नाही. एवढा तुम्हाला भ्रष्टाचार दिसतोय तर ज्या अजिंक्यतारा कारखान्याच्याबाबतीत नेहमीच गरळ ओकत असता त्या कारखान्याच्या निवडणुकीला पॅनेल का उभे केले नाही? छाती काढून यायचं होत ना सभासदांच्या पुढं. कोणी अडवलं होतं? तुमच्या पत्रकबाजीने तुम्ही केलेली कुकर्मे लपणार नाहीत. सातारा पालिकेत झालेला भ्रष्टाचार, अनागोंदी कारभार सातारकरांनी उघड्या डोळ्यांनी पहिला आहे. नशीब, पालिका इमारत नागरिकांच्या मालकीची आहे नाहीत, तीही तुम्ही आणि तुमच्या आघाडीने विकून खाल्ली असती.

मला पण भाऊसाहेब महाराजांचा वारसा आहे. सातारकरांसाठी भाऊसाहेब महाराजांनी भरभरून केले आणि सातारकरांनी ते बघितलेही आहे. त्यामुळे मला वारस्याचं सांगू नका. जनतेची कामे करतो, विकासकामे मार्गी लावतो म्हणून मला जनतेची साथ आहे. तुमचा मार्ग वेगळा आणि माझा मार्ग वेगळा आहे. त्यामुळे तुमच्याबद्दल वाईट वाटण्याचं काहीच कारण नाही. लोकांची कामे करा आणि त्याबद्दलच बोला. भलता फापटपसारा लावू नका. जसे केंद्रात जाऊन निवेदने देताय, तसं एक निवेदन पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनाही द्या आणि स्वतःच्या घरासमोरील रस्त्याचे काम तेवढे मार्गी लावा. शहरातील रस्त्यांची काय अवस्था झाली आहे, हे तुम्हाला का दिसत नाही. सातारकरांचा किती अंत पाहणारा आहात? असा गंभीर प्रश्नही आ. शिवेंद्रसिंहराजेंनी उपस्थित केला आहे. फोटोसेशन करून नौटंकी करणाऱ्यांचा कावा सातारकरांनी ओळखला आहे. त्यामुळे तुम्ही सातारकरांना कितीही गाजरं दाखवली तरी तुम्ही केलेल्या भ्रष्ट कारभाराचा हिशोब सातारकर लवकरच करतील''

उदयनराजे काय म्हणाले?

''ज्यामध्ये जय किंवा पराजय अपेक्षित असतो, त्यालाच निवडणुका म्हणतात. आमचा पराभव आम्ही खुल्या मनाने स्विकारला आहे. तसेच ज्यावेळी जय झाला त्यावेळी हुरळुनही गेलो नाही. आमच्या लोकसभेतील पराभवाची कारणं तोंड वर करुन विचारताय तर आधी तुमच्या विधानसभेतील पोटनिवडणुकीच्या पराभवाची कारणं द्या, मर्ज करण्यासाठीच बँक स्थापन केली होती एक बँक तुमच्या अंदाधुंद कारभाराने बुडीत काढली पण त्याकरीता दुसऱ्या बँकेचाही गळा घोटला, सहकारी बझारचे रेस्टॉरेंट केले, पुढे रेस्टॉरंटही बंद पाडले हे प्रकार सहकारातील तत्वज्ञानात येत नाही परंतु हाच तुमचा खरा वारसा आहे.

आमचा आणि तुमचा मार्ग वेगळा तर आहेच, तसेच अन्य काही बाबी आणि उदिष्ट देखिल वेगळे आहे. आम्ही जनसामान्यांना आमचे समजतो, जनतेला जनार्दन समजतो. आम्ही निस्वार्थी मनाने कार्यरत राहतो, तुमचं तसं नाही, तुम्ही स्वार्थापोटी जनसामान्यांना जवळ करता, जनतेचे किंवा कार्यकर्त्यांचे विक पॉईट हेरुन, त्यांच्या नाड्या आवळता. जनतेमुळे आम्ही आहोत ही भावना आमची तर जनता आमच्यामुळे आहे अशी भावना तुमची.

सहकारी संस्था सभासदांच्या मालकीच्या आणि उध्दारासाठी आहेत ही आमची धारणा तर सहकार म्हणजे स्वतःची खाजगी मालमत्ता ही तुमची धारणा. असा जो काही फरक आहे तो मुलभुत फरक आहे. त्यामुळे दोघांमधील विचारांची उंची व खोली सुध्दा वेगळी आहे. दुस-याच्या पराभवाची कारणे विचारणारे तुम्ही स्वतःला अहंकारी समजता आहात. अहंकाराने सर्वनाश होता हे तुम्ही जाणिवपूर्वक विसरत आहात.

अजिंक्यतारा कारखाना निवडणुक लागल्यावर एकदा भ्रष्ट कारभाराबाबतची अपराधी भावना घेवून तुम्ही आमच्याकडे आला होता. निवडणुकीत लक्ष घालु नका. मी सर्व चुकांची दुरुस्ती करतो असे देखिल म्हणाला होता हे इतक्या लवकर कसे विसरलात ? तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जर आम्ही छाती काढून सभासदांपुढे गेलो तर तुमची छाती जावून, नुसत्या बरकडया राहतील याची पहिल्यांदा नोंद घ्या आणि मग आमच्या छातीकडे या. तुमचे ते काम आणि आमचा तो स्टंट असा शोध तुम्ही लावलेला आहे.

आम्ही ज्यावेळी एकादा प्रकल्प अंतिम टप्यात येतो त्यावेळी त्याची निधीच्या आकडेवारीसह आणि तांत्रिक बाबींसह आम्ही माहीती देत असतो. तुमच्या सारखे आता प्रस्ताव मुख्याधिकारी यांना दिला. लगेच त्याचा फोटो आणि बातमी, आता तो प्रस्ताव जिल्हाधिकारी यांचेकडे आला,त्याचा फोटा आणि बातमी, आता तो प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे गेला, त्याचा फोटो आणि बातमी आता तो प्रस्ताव सचिवांकडे गेला त्याची बातमी आणि त्याचा तुमचा फोटो, आता तो प्रस्ताव जर दादांकडे असेल तर त्याची बातमी आणि यांचा फोटो. परंतु अन्य महोदयांकडे असेल तर मात्र यांना तेथे कोणी विचारतच नाही त्यामुळे त्याची बातमी नाही आणि फोटोसुध्दा नाही. तुम्ही परफेक्शनिस्ट नव्हे तर फंक्शनिष्ट आहात. असला प्रकार तुमचा तुम्हालाच शोभुत दिसतो. हा फरक सुध्दा एक आपल्या मार्गातील वेगळेपण दाखवणारा आहे.

सातारा-कराड हे जंक्शन नाही त्यामुळे येथुन गाडी सुरु करता येत नाही याचे देखिल यांना भान नाही. उचल जीभ लाव टाळ्याला असा यांचा एकंदरीत नखरा आहे. प्लॅटफॉर्म लांबी, प्लॅटफॉर्म शेड, लोहमार्गाचे दुहरीकरण, विद्युतीकरण प्रवाश्यांच्या सुविधांमधील सुधारणा अशी किती तरी कामे केली आहेत. १०-१२ वर्षापूर्वी फक्त ९ गाड्यांची ये-जा सुरु होती. आज रोजी १९ गाडयांची ये-जा सुरु आहे. म्हणजे पूर्वीच्या अप अँड डावुन १८ गाडयांच्या तुलनेत ३८ रेल्वेगाडया आज सातारा कराड मधुन धावतायत, एकदा डोळ्यात अंजन घालुन बघा म्हणजे दिसेल आणि समजेल.''

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com