आणखी दोन ते तीन मंत्री राजीनामा देतील - चंद्रकांत पाटील

आणखी दोन ते तीन मंत्री राजीनामा देतील  - चंद्रकांत पाटील

पुणे -

येत्या 15 दिवसांत आणखी दोन ते तीन मंत्री राजीनामा देतील, असा सामान्य जनतेचा अंदाज आहे असा दावा

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. ते पुण्यात पत्रकार परिषदेत म्हणाले,

महाविकास आघाडी सरकारला जनता कंटाळली आहे. भ्रष्टाचार, हप्ते वसुली अशी प्रकरणे बाहेर येत आहेत. तरीही राज्य सरकार केंद्रावर बोट दाखवत आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी आणखी काय लागेल, हे तज्ज्ञांनी सांगावे. महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेपासून लोक अचंबित आहेत. सचिन वाझे हे महाविकास आघाडी सरकारला किती प्रिय आहेत, हे विधानसभा अधिवेशनाच्या वेळी दिसले. वाझे प्रकरणावरून सरकारने नऊ वेळा विधानसभा स्थगित केली. वाझे यांचा चार्ज काढून घेण्याची घोषणा अनिल परब यांनी केली. ही घोषणा गृहमंत्र्यांनी करायला हवी होती.

येत्या 15 दिवसात आणखी दोन ते तीन मंत्र्यांचे राजीनामे होणार हा सामान्यांचा अंदाज आहे. वाट पाहू आणखी कोणी कोर्टात जाईल. अनिल परब यांचा त्रागा आहे. चौकशीला सामोरे जाणार असाल तर शपथा कसल्या घेताय? निष्पक्षपणे चौकशी व्हावी म्हणून राजीनामा दिला आणि चौकशी होऊ नये म्हणून सुप्रीम कोर्टात गेले. राठोड झाले, देशमुख झाले आणि परबांचे नाव आले आहे. ही संघटीत गुन्हेगारी आहे. या संघटीत गुन्ह्याचे पुरावे कागदपत्रात आले तर या सर्वांवर मोक्का लावावा. जो सामान्य नागरिकांना न्याय आहे, तोच न्याय यांनाही लावायला हवा.

दिलीप वळसे पाटील यांनी गृहखात्याचा चार्ज घेताना कोणकोणते अधिकारी आरएसएसशी संबंधित आहेत, त्याचा शोध घेऊ असे सांगितले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दहशतवादी संघटना आहे का? ही गुन्हेगार संघटना आहे का कोरोना संकट, भूकंप अशा विविध संकटात आरएसएस किती कार्य करतो हे दिलीप वळसे पाटील यांनी सांगायची गरज नाही. तुमच्या राजकारणात आरएसएसला ओढू नये असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com