मुंबई -

विधानसभेचे हिवाळी अधिवेशन दोन आठवड्यांऐवजी दोन दिवसांचे घेतले जाणार आहे. येत्या 14 व 15 डिसेंबरला हे अधिवेशन होणार असल्याचे

जाहीर करण्यात आलं आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विरोध केला आहे. केवळ दोन दिवसांचं अधिवेशन आम्हाला मान्य नाही, अनेक प्रश्नांवरील चर्चेसाठी विधानभवन हे महत्वाचं स्थान असताना दोन दिवसांचं अधिवेशन घेणे म्हणजे चर्चेपासून पळ काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असं फडणवीस म्हणाले आहेत.

विधानसभेचं हिवाळी अधिवेशन पुन्हा एकदा पुढे ढकललं गेलं, पण त्यापेक्षा गंभीर बाब म्हणजे केवळ दोन दिवसांचं अधिवेशन 14 आणि 15 डिसेंबरला घेण्यात येणार आहे. आमचा सातत्याने आग्रह होता की महाराष्ट्रामध्ये शेतकर्यांसमोर अभूतपूर्व संकट आहे. पहिल्यांदा पावसाने, अतिवृष्टीने, पुराने चक्रीवादळाने आणि रोगराईने शेती पूर्णपणे नष्ट झाली आहे. कापूस, सोयाबीनचं मोठं नुकसान झालं आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न रेंगाळला आहे. ओबीसींमध्ये भीतीचं वातावरण आहे. महिलांवरील अत्याचारांच प्रमाणही वाढलं आहे. या अनेक प्रश्नांवरील चर्चेसाठी विधानभवन हे महत्वाचं स्थान असताना दोन दिवसांचं अधिवेशन घेणे म्हणजे चर्चेपासून पळ काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, अशी घणाघाती टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

राज्यात अनलॉक होत असताना विधानसभेच्या अधिवेशनावर बंधन का?

राज्यात आपण सर्व अनलॉक करण्याची भूमिका घेतली आहे. जवळपास सर्व गोष्टी आता सुरू झाल्या आहेत. असं असताना विधानसभेच्या अधिवेशनावरच बंधन का?, असा सवालही फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. कोरोना काळ असल्याने किमान दोन आठवड्यांचं अधिवेशन बोलवावं अशी आम्ही मागणी केली होती पण ती मान्य न करता केवळ दोन दिवसांचं अधिवेशन बोलविण्यात आलं आहे. यातून सरकारचा चर्चेपासून पळ काढण्याचा उद्देश लक्षात येतो, असंही ते पुढे म्हणाले.