Friday, April 26, 2024
Homeराजकीयतृणमूलला मोठं खिंडार; शुभेंदू अधिकारी आणि ११ आमदार शहांच्या उपस्थितीत भाजपमध्ये

तृणमूलला मोठं खिंडार; शुभेंदू अधिकारी आणि ११ आमदार शहांच्या उपस्थितीत भाजपमध्ये

दिल्ली । Delhi

भारतीय जनता पक्षाने पूर्वोत्तर भारतात कमळ फुलवण्याचा चंग बांधला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसांच्या पश्चिम बंगाल दौऱ्यावर शुक्रवारी रात्रीच दाखल झाले असून आज मेदिनीपूर येथील सभेद्वारे त्यांनी तृणमूल काँग्रेसला तगडा झटका दिला आहे. गेल्या काही महिन्यांपासून पक्षातल्या अनेक दिग्गज नेत्यांनी पक्षाला सोडचिढ्ढी दिली आहे. त्यात आता आणखी एक नाव जोडलं गेलं आहे.

- Advertisement -

ममता बॅनर्जी यांच्या अत्यंत विश्वासातले समजले जाणारे शुभेंदू अधिकारी(Suvendu Adhikari) यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या उपस्थितीत मिदनापूर इथं झालेल्या जाहीर सभेत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अधिकारी यांच्यासोबत तृणमूलच्या काही आजी-माजी आमदारांनीही पक्षात प्रवेश केला आहे. अधिकारी यांचा भाजप प्रवेश हा बंगालामध्ये तृणमूलला मोठा हादरा मानला जातोय.

केंद्रीय गृहमंत्री व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. अमित शाह यांच्या दौऱ्यादरम्यान भाजपाने तृणमूल काँग्रेसविरोधात एल्गार पुकारला. शाह यांच्या उपस्थितीत तृणमूलमधून बाहेर पडलेल्या सुवेंदू अधिकारी यांच्यासह ११ आमदार व एका माजी खासदाराने कमळ हाती घेतले. मिदनापूर येथे झालेल्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम झाला.

यावेळी बोलताना अमित शाह म्हणाले,”आज सर्व पक्षांतील चांगले लोक भाजपात दाखल झाले आहेत. आज एक माजी खासदार आणि तृणमूल काँग्रेसमधील आमदार भाजपामध्ये आले आहेत. ही तर सुरूवात झाली आहे. निवडणूक येईपर्यंत ममता दीदी तुम्ही एकट्याच राहाल. सुवेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि सीपीएमचे चांगले लोक नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी पक्षात आले आहेत. ममता दीदी म्हणतात, भाजपा लोकांना करायला लावते. दीदींना मी आठवण करून देऊ इच्छितो की, जेव्हा तुम्ही काँग्रेस सोडून तृणमूल पक्ष बनवला, ते पक्षांतर नव्हते का?,” असा सवाल शाह यांनी ममता बॅनर्जी यांना केला.

पुढे बोलताना शाह म्हणाले, “जेव्हा विधानसभा निवडणुकीचे निकाल लागतील, तेव्हा २०० पेक्षा अधिक जागा जिंकून भाजपा सत्तेत आलेली असेल.” बंगालच्या जनतेला आवाहन करताना अमित शाह म्हणाले,”तुम्ही तीन दशकं काँग्रेसला दिली. २७ वर्ष कम्युनिस्टांना दिलीत. १० वर्ष ममता दीदींना दिलीत. भारतीय जनता पक्षाला पाच वर्ष द्या. आम्ही बंगालला सोन्यासारखं बनवू,” अशी ग्वाही शाह यांनी दिली.

ममतांचा विजयी रथ रोखण्यासाठी भाजप जोरदार रणनीती आखत आहे. त्यामुळेच अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या राज्याकडे आपलं लक्ष वळवलं आहे. शहा यांनी आजच्या सभेत बोलताना पश्चिम बंगाल जिंकण्याचं आपलं स्वप्न अगदी स्पष्टच शब्दांत बोलून दाखवलं.

- Advertisment -

ताज्या बातम्या