नंदुरबारमध्ये काँग्रेसतर्फे ट्रॅक्टर रॅली

 नंदुरबारमध्ये काँग्रेसतर्फे ट्रॅक्टर रॅली

नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

केंद्र सरकारने केलेले शेतकरीविरोधी काळा कायदे रद्द करण्यात यावे, कामगारांना संरक्षण देण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी जिल्हा कॉँग्रेस कमिटीच्या वतीने

आज किसान बचाव ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या ट्रॅक्टर रॅलीत सुमारे 250 ट्रॅक्टरधारक शेतकरी सहभागी झाले होते. या रॅलीचे नेतृत्व आदिवासी विकास मंत्री ना.अ‍ॅड.के.सी.पाडवी यांनी केले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

केंद्र सरकारने शेतकरी विरोधी, कामगारविरोधी कायदे केले आहेत. सदर कायदा रद्द करण्यासाठी आज जिल्हा काँग्रेसतर्फे निदर्शने करण्यात येत आहेत.

यानिमित्त नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आदिवासी विकासमंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी यांच्या नेतृत्वाखाली ट्रॅक्टर्स रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये जिल्हाभरातील सुमारे 250 शेतकरी ट्रॅक्टरसह रॅलीत सहभागी झाले होते. केंद्र सरकारचे शेतकर्‍यांच्या विरोधातील केलेले काळे कायदे रद्द करावे, कामगारांना संरक्षण देण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी ही रॅली काढण्यात आली होती.

रॅलीत युवक व महिला शेतकरी देखील सहभागी झाल्या होत्या. यावेळी केंद्र सरकारविरुद्ध घोषणाबाजी करण्यात येवून निषेध व्यक्त करण्यात आला.

शेतकर्‍यांनी ट्रॅक्टरला ऊस, कपाशी, केळी आणि ज्वारीचे कणीस लावून वस्तूस्थिती प्रदर्शित करण्याचा प्रयत्न केल्याचे रॅलीतून दिसून आले.

जोपर्यंत शेतकरी विरोधी कायदे केंद्र सरकार मागे घेत नाही तसेच कामगार विरोधी कायदा रद्द करत नाही तोपर्यंत कॉँग्रेसतर्फे नंदुरबार जिल्ह्यात आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला आहे.

सदर रॅलीमध्ये जि.प.अध्यक्षा अ‍ॅड.सीमा वळवी, आ.शिरीषकुमार नाईक, नंदुरबार जिल्हा प्रभारी श्री.पानगव्हाणे, माजी मंत्री पद्माकर वळवी, कॉँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष दिलीप नाईक, सुभाष पाटील, विश्वास पाटील, अशोक पाटील, जिल्हा कॉँग्रेस सेलचे नरेश पवार तसेच योगेश चौधरी आदी सहभागी झाले होते.

नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीपासून रॅलीला सुरुवात झाल्यानंतर अंधारे स्टॉप ते नाट्यमंदिर परिसरादरम्यान रॅली जात असतांना काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com