
मुंबई | प्रतिनिधी Mumbai
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार( Sharad Pawar) यांच्या डोळ्यावर आज, मंगळवारी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. येथील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात ( Breach Candy Hospital )त्यांच्या उजव्या डोळ्यातील मोतीबिंदूची शस्त्रक्रिया केली जाणार आहे. शस्त्रक्रियेनंतर त्यांना किमान आठ दिवस विश्रांती घ्यावी लागणार आहे.
शरद पवार यांच्या डाव्या डोळ्यावर यापूर्वी मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. आता त्यांच्या उजव्या डोळ्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया केली जाईल. शस्त्रक्रियेनंतर त्यांना लगेचच घरी सोडले जाण्याची शक्यता आहे. शस्त्रक्रियेनंतर डोळ्याला संसर्ग होऊ नये यासाठी त्यांना सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार आहे.
गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये पवारांची तब्बेत बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हा देखील पवारांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला होता.
अनिल देशमुखांनी घेतली पवारांची भेट
दरम्यान, कथित १०० कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोपामुळे गेले वर्षभर तुरुंगात राहिलेले आणि अलिकडेच जामिनावर सुटलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी शरद पवार यांची त्यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेतली. पवारांनी देशमुख यांचे स्वागत केले. यावेळी दोघांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली.