तृणमूलचे खासदार दिनेश त्रिवेदी यांचा थेट राज्यसभेत राजीनामा

ममता बनर्जी यांना मोठा धक्का
तृणमूलचे खासदार दिनेश त्रिवेदी यांचा थेट राज्यसभेत राजीनामा

दिल्ली l Delhi

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली असून राजकीय वातावरण तापू लागले आहे. निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जींना मोठा झटका मिळाला आहे. राज्यसभेत अर्थसंकल्पावर चर्चा सुरु असतानाच

नाट्यमय घडामोड घडली असून तृणमूल काँग्रेसच्या खासदाराने राजीनामा दिला आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार दिनेश त्रिवेदी यांनी राज्यसभेतच राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे. अशा प्रकारे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याचा राजीनामा ममता बॅनर्जींसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

राज्यसभेत बोलताना दिनेश त्रिवेदी म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात अशी एक वेळ येते जेव्हा अंतर्मनाचा आवाज ऐकू येतो. आज माझ्या आयुष्यात ती वेळ आली आहे. मी आज राज्यसभेतून राजीनामा देत आहे. मला राज्यसभेत पाठवल्याबद्दल मी माझ्या पक्षाचा आभारी आहे. पण राज्यात हिंसाचार सुरु असतानाही आपण काही करत नाही यामुळे माझी घुसमट होत आहे. जर आपण येथे बसूनही काहीच करु शकत नाही तर मग राजीनामा दिला पाहिजे असं माझं मन सांगत आहे. बंगालच्या लोकांसाठी मी काम करत राहीन. असं दिनेश त्रिवेदी यांनी म्हंटले आहे.

मोदींचे केले कौतुक..

राज्यसभेत बोलतांना दिनेश त्रिवेदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामाची स्तुती देखील केली. ते बोलतांना म्हणाले, आपण देशासाठी राजकारणात येतो. देश सर्वोच्च आहे. दोन दिवसांपूर्वी माननीय मोदी आणि गुलाम नबी आझाद यांनी देशासाठी भावना व्यक्त केली. करोना संकटातही भारताने चांगली कामगिरी केली. मोदींनी १३० कोटी नागरिकांना श्रेय दिलं, पण नेतृत्व त्यांचं होतं.

दरम्यान, बंगालमध्ये मागील दोन महिन्यात ११ तृणमूलच्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. याची सुरुवात तृणमूलचे जेष्ठ नेते शुभेंदु अधिकारी यांच्याने झाली. त्यानंतर खासदार सुनील मंडल, माजी खासदार दशरथ तिर्की आणि १० आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com