कोलकाता । Kolkata

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसमधून अनेक बडे नेते पक्षाला रामराम करत असल्याने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची चिंता वाढली आहे.

बंगालच्या राजकारणात दबदबा असलेले नेते सुवेंदू अधिकारी यांच्यानंतर तृणमूलच्या आणखी एका आमदाराने पक्षाचा राजीनामा दिला आहे. मागील दोन दिवसांत तीन नेत्यांनी तृणमूल सोडल्यानं ममतांची डोकेदुखी वाढली आहे.

मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांचे मंत्रिमंडळातील सहकारी आणि पक्षाचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी पक्षाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनामा हा ममतांना मोठा धक्का मानला जात असतानाच जितेंद्र तिवारी यांनीही तृणमूलला रामराम केला. दोन नेत्यांच्या राजीनाम्यानं पश्चिम बंगाल राजकारणात खळबळ उडालेली असतानाच तृणमूलच्या आणखी एका नेत्याने राजीनामा दिला आहे. आमदार शीलभद्र दत्त यांनी तृणमूल काँग्रेसचा राजीनामा दिला. शीलभद्र दत्त यांच्याबरोबर तृणमूलचे नेते कबिरूल इस्लाम यांनी पक्षाच्या अल्पसंख्यांक सेलच्या महासचिव पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे तेही लवकरच तृणमूल सोडणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे.

बंडखोर नेते पक्षाला रामराम करत असताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, काही लोक जिथे वारं वाहतं त्याठिकाणी जातात पण जे खरे तृणमूल काँग्रेसची आहेत ते पक्षातच आहेत. भाजपा निर्लज्जपणे टीएमसीच्या नेत्यांची शॉपिंग करत आहे, हे कोणत्याप्रकारचं राजकारण आहे? तर दुसरीकडे टीएमसी नेते म्हणतात की, जे नेते पक्ष सोडत आहेत त्यांना विधानसभेत उमेदवारी मिळणार नाही याची भनक लागली आहे. तर कोळसा आणि गो तस्करी प्रकरणात चौकशी करण्याच्या केंद्रीय संस्थेच्या दबावापोटी अनेक नेते पक्ष सोडत असल्याचंही सांगितले जात आहे.