Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याकाँग्रेसला फटकारले... सिब्बल आणि राजदकडून घरचा आहेर

काँग्रेसला फटकारले… सिब्बल आणि राजदकडून घरचा आहेर

नवीदिल्ली – देशातील राजकारणात दरनिवडणुकीत रसातळाला जाणारी कामगिरी करणार्‍या काँग्रेस नेतृत्वाला आरसा दाखविण्याचे काम आता स्वपक्ष आणि मित्रपक्षांकडून सुरू झाले आहे.

नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा आणि अन्य राज्यातील पोटनिवडणुकांमधील काँग्रेसच्या खराब कामगीरीनंतर पक्षात नाराजीचा स्वर उमटू लागला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी आपली खंत व्यक्त करताना पक्षाच्या आजच्या स्थितीसाठी वरिष्ठ नेतृत्वाला फटकारले आहे. एकप्रकारे त्यांनी राहुल गांधी यांच्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

- Advertisement -

एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आत्मचिंतनाची वेळ संपली आहे, असे शब्दात पक्षनेतृत्वाला सुनावले आहे. अनुभवी नेत्यांंना जबाबदारी देण्याची गरज आहे. ज्या राज्यांमध्ये सत्ताधार्‍यांना पर्याय हवा होता, तेथेही काँग्रेसला जनतेने स्वीकारलेले नाही. पक्षाला सतर्क नेतृत्वाची गरज आहे. जनता स्वीकारत नाही, असे का घडले हे आपण जाणून आहोत. जनता आपल्याला स्वीकारत नाही, हे पक्षाने आता स्वीकारले पाहिजे.

पक्षात आता संवाद राहिलेला नाही. पक्षाकडूनही असा प्रयत्न होत नाही. त्यामुळे आपली भुमिका जाहिरपणे मांडण्यासाठी विवश आहे. सर्वात आधी पक्षाने संवाद प्रक्रीया सुरू करावी. जनतेपर्यंत पोहचावे. जनतेला आपली भुमिका मांडता येईल, असे नेतृत्व उभे करावे लागेल. जनता आणि माध्यमात ज्यांना स्वीकारले जाईल, असे नेतृत्व समोर करावे लागेल, असेही ते म्हणाले.

मध्यंतरी काँग्रेस पक्षाला 23 नेत्यांनी चिंता व्यक्त करणारे पत्र लिहीले होते. यात सिब्बल यांचा समावेश होता. मात्र या पत्रानंतरही पक्षात काही बदल झाला नाही. उलट पत्र लिहीणार्‍या नेत्यांचे पंख छाटले गेले.

राहुल गांधी सुटी साजरी करत होते…

दुसरीकडे बिहारमधील मित्रपक्षातील नेतेही पराभवासाठी काँग्रेसला दोष देत आहेत. राजदचे नेते शिवानंदन तिवारी यांनी बिहारमध्ये सत्ता न मिळण्याचे कारण काँग्रेस असल्याचा आरोप केला. महाआघाडीवर काँग्रेस हे ओझे असल्याचे त्यांनी म्हटले. काँग्रेसने बिहारमध्ये 70 उमेदवार मैदानात उतरवले. मात्र तेवढ्या रॅली, सभा घेतल्या नाहीत. राहुल गांधी फक्त 3 सभांना आले. प्रियंका गांधी तर आल्याच नाहीत. ज्यांना प्रचारासाठी पाठवले, त्यांना या प्रदेशाबाबत काही माहितच नव्हते. प्रचार ऐन भरात असताना राहुल गांधी आपल्या बहिणीच्या घरी पिकनीक करत होते. पक्ष असा चालवला जातो का?, असा सवालही त्यांनी जाहीरपणे केला.

बिहारमध्ये 70 जागा लढविणार्‍या काँग्रेसला अवघ्या 19 जागा जिंकता आल्या. या उलट राजदने सर्वात मोठा पक्ष ठरत 75 जागा जिंकल्या तर कमी जागा लढविणार्‍या डाव्या पक्षांनी चांगले यश मिळवले. महाआघाडीला सत्तेत पोहचण्यासाठी 12 जागा कमी पडल्या. यासाठी काँग्रेसचे खराब प्रदर्शन कारणीभूत ठरल्याचे म्हटले जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या