Thursday, April 25, 2024
Homeराजकीयतिसरी लाट लक्षात घेता, आरोग्य यंत्रणा सुसज्ज करावी - अजित पवार

तिसरी लाट लक्षात घेता, आरोग्य यंत्रणा सुसज्ज करावी – अजित पवार

पुणे |प्रतिनिधी| Pune

करोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी गाफील राहून चालणार नाही. उपचार यंत्रणा सुसज्ज ठेवण्यासोबतच चाचण्या व सर्वेक्षणात सातत्य ठेवा, कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता, आरोग्य यंत्रणा सुसज्ज करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले. पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरातील निर्बंधामध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यासंदर्भात मंत्रालयस्तरावर चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी आज स्पष्ट केले. सोमवारपासून ७ वाजेपर्यंत व्यवहार सुरू ठेवण्याचा विचार करीत आहोत. त्याबाबत निश्चित सकारात्मक निर्णय घेऊ, असेही ते म्हणाले.

- Advertisement -

पुणे विधानभवनाच्या सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती व उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.

पवार म्हणाले, कोरोनामुळे अनेक निर्बंध लादण्यात आले आहे. त्यातील एक म्हणजे दुपारी ४ वाजेपर्यंत दुकाने सुरू आहेत. तरी देखील मागील दरवाजाद्वारे दुपारनंतर दुकाने सुरू असतात हे सांगण्यात आले आहे. एका बाजूला बाधितांची संख्या कमी झाल्यामुळे, व्यवहार सात वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी आजच्या बैठकीत सर्वांनी केली आहे. या सर्व बाबींचा विचार करता, सोमवारपासून सात वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून निर्णय घेऊ आणि हा निर्णय सकारात्मक असेल, अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.

करोनाची संभाव्य तिसरी लाट विचारात घेता पुणे व पिंपरी चिंचवड महानगरांसह ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सुसज्ज करावी. व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन प्रणाली व आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ आदींसह उपचार सुविधांचा सातत्याने आढावा घेण्यात यावा, तसेच ग्रामीण भागात राबविण्यात येत असलेली धडक सर्वेक्षण व नमुना तपासणी मोहीम अधीक गतीमान करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

पुणे जिल्ह्याचा लसीकरणाचा वेग समाधानकारक असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुणे जिल्ह्याने कोविड लसीकरणामध्ये 55 लाखाचा टप्पा पार केला ही समाधानाची बाब आहे, एका दिवसात एक लाखाहून अधीक लसीकरणही जिल्ह्याने पूर्ण केले आहे, मात्र लस उपलब्धता त्या तुलनेत कमी असल्याने लसीकरणाला गती देता येत नाही, लस उपलब्धतेसाठी सातत्याने राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येत असून अधिकाधिक लसीकरण वाढीचा सातत्याने प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या