विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त जागांसाठी 'हे' चेहरे चर्चेत

करोनामुळे राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या १२ जागांवरील नियुक्त्या रखडल्या होत्या
विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त जागांसाठी 'हे' चेहरे चर्चेत

मुंबई | Mumbai

करोनामुळे राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या १२ जागांवरील नियुक्त्या रखडल्या होत्या. मात्र उद्या बुधवारी होणा-या मंत्रिमंडळ बैठकीत या १२ सदस्यांच्या नावाचा प्रस्ताव येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या नियुक्तीबाबत मागच्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव येणार अशी चर्चा सुरू होती. परंतू काही कारणास्तव प्रस्ताव पुढे ढकलण्यात आला. त्यामुळे आता उद्या बुधवारी याचा मुहूर्त निघणार असल्याची माहिती आहे.

त्यादृष्टीने महाविकासआघाडी सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. महाविकासआघाडीतील शिवसेना , राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असे तिन्ही घटक पक्ष समसमान जागा वाटून घेण्याची शक्यता आहे. दरम्यान, या तिन्ही पक्षांमध्ये विविध चेहऱ्यांमध्ये राज्यपाल नियुक्त आमदारकी मिळविण्यासाठी मोठी चुरस आहे. या जागांसाठी अनेक नाव चर्चेत आहे. मात्र राज्यपाल आपली सहमती दर्शवणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या काही दिवसांत सत्ताधारी विशेषकरून शिवसेना आणि राज्यपाल यांच्यात शाब्दिक वाद रंगलेला पाहायला मिळाला होता.त्यामुळे १२ सदस्यांच्या नावांना मंजूरी देण्याबाबत राज्यापाल काय निर्णय घेणार हे पाहावे लागेल.

शिवसेनेकडून सुनिल शिंदे (माजी आमदार) सचिन अहिर (माजी मंत्री) मिलिंद नार्वेकर(पक्ष सचिव) राहुल कनाल (युवा सेना), विजय आप्पा करंजकर ( जिल्हाप्रमुख ), भाऊसाहेब चौधरी (संपर्कप्रमुख, नाशिक), नितिन बानगुडे पाटील (उपनेते), अर्जुन खोतकर(माजी मंत्री) ही नाव चर्चेत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे (नुकताच पक्षप्रवेश), राजू शेट्टी (स्वाभिमानी शेतकरी संघटना), श्रीराम शेटे, आनंद शिंदे (गायक), उत्तमराव जानकर, आदिती नलावडे, शिवाजी गर्जे ही नाव चर्चेत आहे.

तर काँग्रेसकडून सचिन सावंत (प्रवक्ते), सत्यजित तांबे (युवक काँग्रेस अध्यक्ष), मोहन जोशी, नसीम खान यांची नाव चर्चेत आहे.

दरम्यान, भारतीय जनता पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या नावाचीही राज्यपाल नियुक्त जागेसाठी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. परंतू, खडसे यांच्या नावावर पुष्टी झाल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अद्यापपर्यंत तरी कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. त्यामुळे खडसे यांना विधानपरिषदेवर आमदारकी मिळणार? याबात उत्सुकता आहे.

कला, वाङ्मय, विज्ञान, सहकारी चळवळ आणि सामाजिक कार्य अशा क्षेत्रातील तज्ज्ञ किंवा प्रत्यक्ष कामाचा अनुभव असलेल्या व्यक्तींची राज्यपाल विधान परिषदेवर नियुक्ती करु शकतात. तज्ज्ञांच्या अनुभवाचा राज्याला फायदा व्हावा, यासाठी विधान परिषदेसारख्या वरिष्ठ सभागृहात दिग्गजांची नियुक्ती करण्याची घटनेत तरतूद आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेत 12 सदस्य नियुक्त करण्याचे राज्यपालांना अधिकार आहेत. मंत्रिमंडळाकडून शिफारस करण्यात आलेली नावे राज्यपालांकडून स्वीकारली जातात.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com