VIDEO : भाजप समर्थकांनीच केली घोषणाबाजी; व्हिडिओ शेअर करत नाना पटोलेंनी साधला निशाणा

VIDEO : भाजप समर्थकांनीच केली घोषणाबाजी; व्हिडिओ शेअर करत नाना पटोलेंनी साधला निशाणा

मुंबई | Mumbai

पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत घोडचूक ( Security Lapses In Punjab ) झाली. हे प्रकरण तापले आहे. गृह मंत्रालयाने एका निवेदनात म्हटलं आहे की, काही आंदोलकांनी रास्ता रोको केल्यामुळं पंतप्रधान १५-२० मिनिटे उड्डाणपुलावर अडकले होते. (PM Modi Security Breach) या गंभीर सुरक्षेतील त्रुटींची दखल घेत गृह मंत्रालयाने राज्य सरकारकडून सविस्तर अहवाल मागवला आहे.

या घटनेवरून राजकीय वादंग निर्माण झाला असून, भाजपा आणि काँग्रेसने परस्परांवर टीकेचा भडिमार सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एक व्हिडिओ शेअर करत, पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

नाना पटोलेंनी ट्विटरवर व्हिडिओ देखील शेअर करत म्हंटले आहे की, 'पंतप्रधानांच्या सुरक्षेचा कांगावा करणाऱ्या गोदी मीडिया आणि भाजपाचा प्रोपगंडा फुटला. मोदींच्या ताफ्यासमोर आंदोलनकारी नसून भाजपाचे कार्यकर्ते होते, या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे.' नाना पटोलेंनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदींचा ताफा जात असलेल्या रस्त्याच्या कडेला उभा राहून भाजपा कार्यकर्ते घोषणाबाजी करताना दिसून येत आहेत. या वेळी मोदींचा वाहन ताफा काही क्षण थांबल्याचेही दिसून येत आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण

५ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाबच्या भटिंडा येथे पोहोचले. येथून त्यांना हेलिकॉप्टरने हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकावर जायचे होते. पण अपुरा प्रकाश आणि पावसामुळे पीएम मोदी यांना तब्बल २० मिनिटं वाट पाहावी लागली. पण हवामानात सुधारणा होत नसल्याने त्यांनी रस्त्याने राष्ट्रीय हुतात्मा स्मारकाकडे जाण्याचा निर्णय घेतला. या मार्गाने त्यांना तब्बल २ तास लागणार होते. पंजाब डीजीपीकडून सुरक्षा व्यवस्थेची पुष्टी केल्यानंतर पंतप्रधान मोदी हे रस्त्याने गेले. पंतप्रधान मोदींचा ताफा हा राष्ट्रीय हुतात्मा स्मारकापूर्वी सुमारे ३० किमी अंतरावर असलेल्या उड्डाणपुलावर पोहोचला तेव्हा काही आंदोलकांनी इथे रस्ता अडवला. त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या ताफ्याला उड्डाणपुलावर १५ ते २० मिनिटे थांबावे लागले. पंतप्रधानांच्या सुरक्षेतील ही मोठी चूक मानली जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com