नक्षल वाद्यानी लिहिलेल्या पत्राकडे फार लक्ष देण्याची गरज नाही – वळसे पाटील

पुणे (प्रतिनिधी) – नक्षली चळवळ ही व्यवस्थेच्या विरोधात असलेली चळवळ आहे, मराठा आरक्षणावरून नक्षल वाद्यानी लिहिलेल्या पत्राकडे फार लक्ष देण्याची गरज नाही असे मत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले. व्यवस्थेच्या विरोधात काम करत असलेल्यानी इतर लोकांना तुम्ही आमच्यात या आणि संघर्ष करा असे सांगणे हे देशाला एकप्रकारे आव्हानच आहे किंवा धोकाच आहे असा अप्रत्यक्ष टोला वळसे पाटील यांनी संभाजीराजे छत्रपती यांना लगावला.

माओवादी संघटनेने एक पत्रक काढले होते. त्यामध्ये त्यांनी मराठ्यांनो दलाल नेत्यांपासून सावध व्हा, तुमच्या संघटीत शक्तीला ते राजकारणाकरीता वापरत आहेत, असे म्हटले होते. त्यांच्या या पत्रकानंतर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही पत्रक काढून सर्वच नक्षलवादी संघटनांना लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात येण्याबाबत आवाहन केले होते. त्याबत विचारले असता वळसे पाटील यांनी वरील वक्तव्य केले. पुण्यातील मांजरी येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या संचालक मंडळाच्या बैठकीसाठी वळसे पाटील उपस्थित होते. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

वळसे पाटील म्हाणाले, नक्षलवाद्यांच्या या कृतीचा जास्त विचार करायची गरज नाही. बाकी आपल्या लोकशाही व्यवस्थे मध्ये राज्यघटना, सरकार, न्यायालये यांच्या माध्यमातून सगळे प्रश्न सोडवले जाता आहेत. लोकशाही मार्गाने होणारे आंदोलन, मोर्चे तसेच चर्चेतून प्रश्न सुटत असतात. त्यामुळे नक्षलवाद्यांच्या या पत्राला महत्व देऊ इच्छित नाही असे गृहमंत्री वळसे पाटील यावेळी म्हणाले. दरम्यान या निमित्ताने अर्बन नक्षलवाद डोके वर काढतोय का असे विचारले असता तसे वाटत नाही , नक्षलवाद्यांनी मराठा समाजाला केलेले हे आवाहन एक सर्वसाधारण आवाहन आहे त्याला कोणी प्रतिसाद देईल असे वाटत नाही असे वळसे पाटील म्हणाले.

आजकाल समाजमाध्यमाचा गैरवापर करण्याचे प्रमाण वाढलेले आहे आणि त्यात काही पक्ष काही संघटना या जाणीवपूर्वक त्यांची ट्रोल आर्मी तयार करून वेगवेगळ्या लोकांची बदनामी करण्याचा प्रयत्न करतायत त्यामुळे अशा प्रकरणात पोलीस सायबर कायद्याअंतर्गत कारवाई करणारच असे गृहमंत्री यावेळी म्हणाले. शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात समाजमाध्यमात आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी झालेल्या कारवाई बाबत बोलताना गृहमंत्र्यांनी हे भाष्य केले.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *