जयंत पाटील आणि सीताराम कुंटे यांच्यातील वादात काही तथ्य नाही - अजित पवार

जयंत पाटील आणि सीताराम कुंटे यांच्यातील वादात काही तथ्य नाही - अजित पवार

पुणे (प्रतिनिधि) - जयंत पाटील हे अधिकाऱ्यांशी सौजन्याने वागतात. ते गृहमंत्री, ग्रामविकास मंत्री होते. त्यांना अधिकाऱ्यांशी कसे वागायचे हे चांगले माहीत आहे. त्यामुळे जयंत पाटील आणि राज्याचे मुख्यसचिव सीताराम कुंटे यांच्यातील वादात काही तथ्य नाही. त्यांच्यात कोणतीही वादावाद झाली नाही असे स्पष्ट करतानाच जयंत पाटील हे शांत स्वभावाचे आहेत, उलट मीच तापट स्वभावाचा आहे अशी टिप्पणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

पुण्यामध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. तयावेळी त्यांनी जयंत पाटील आणि कुंटे यांच्यातील वादावर भाष्य केले. पाटील आणि कुंटे यांच्यातील वादात काही तथ्य नाही. त्यांच्यात कोणतीही वादावाद झाली नाही. बातम्या जरा दुसरीकडेच जात आहेत, असं ते म्हणाले.

मराठा आरक्षणासाठी आम्ही कटीब्ध आहोत. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी एका दिवसाचं अधिवेशन घेण्याचीही आमची तयारी आहे, असं पवार म्हणाले.

तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. तिसऱ्या लाटेचा धोका लहान मुलांना सर्वाधिक असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे आम्ही त्या दृष्टीने नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक जिल्ह्यात हे नियोजन करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. हॉस्पिटलमधील किमान 10 बेड्स लहान मुलांसाठी आरक्षित ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. लहान मुलांमधील धोका ओळखून टास्क फोर्स स्थापन करणार आहोत.

तहान लागल्यावर विहीर खोदणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. लहान मुलांनाही लस देण्याबाबतचे प्रस्ताव आले आहेत. त्यामुळे लस निर्मिती करण्यास सांगितलं आहे. काही देशात लहान मुलांना लस दिली जात आहे. तिकडे लहान मुलांना लस देण्याचा कार्यक्रम यशस्वी झाल्यावर आपल्या देशातही लहान मुलांचं लसीकरण करावं लागणार आहे, असं त्यांनी सांगितलं.

ऑक्सिजनचा पुरवठ्याची माहिती केंद्र सरकारने जाहीर करावी

आम्ही ऑक्सिजनचं उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत. रात्र न् दिवस त्यावर काम करत आहोत. पण मशिनरी आहे, त्यामुळे कधी तरी एखादा प्लांट बंद पडतो. मात्र, तरीही 3 हजार मॅट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे, असं सांगतानाच कुठल्या राज्यांना किती ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला त्याची माहिती केंद्र सरकारने जाहीर करावी, अशी मागणीही त्यांनी केली. ज्या राज्यांमध्ये जास्त रुग्णसंख्या आहे, त्यांना अधिक ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात यावा, असंही ते म्हणाले.

म्युकोरमायकोसिसवरील औषधांचा काळाबाजार होणार नाही

म्युकोरमायकोसिस वरील औषधांचा काळा बाजार होणार नाही याची खबरदारी घेणार आहोत. आधीच हे औषध महागडं असल्याने त्याचा काळाबाजार होईल असं वाटत नाही. पुरेशा प्रमाणावर औषध उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेत या उपचाराचा समावेश करण्यात आल्याने त्याचा गरीबांना लाभ होणार आहे, असं ते म्हणाले.

लस उत्पादनाला तीन महिने लागणार

भारत बायोटेकने पुणे जिल्ह्यात 28 एकर जमीन मागितली आहे. त्यांना लसीच्या उत्पादनासाठी ही जमीन हवी असून त्यांना जमीन देण्याच्या सूचना तातडीने देण्यात आल्या आहेत. त्यांच्या लसीचे उत्पादन सुरू व्हायला 3 महिने लागतील. परंतु त्याधी त्यांना आवश्यक गोष्टी उपलब्ध होतील, असंही ते म्हणाले.

दरम्यान, ग्लोबल टेंडर काढण्यासाठी पालिकेला राज्य सरकार परवानगीची गरज नसते. पालिकेने स्वत टेंडर काढायचे असतात. मुंबई महापालिकेनेही ग्लोबल टेंडर काढले आहे. पुणे पालिकेचे गटनेते चुकीची माहिती देत आहेत, असं त्यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com