सत्तेच्या हव्यासापोटी मंदिराचे राजकारण - काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांचा आरोप

तर सुपरस्प्रेडर भाजपा नेत्यांच्या मुसक्या आवळा
सत्तेच्या हव्यासापोटी मंदिराचे राजकारण - काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांचा आरोप

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

केंद्र सरकारच्या ( Central Govt ) इशाऱ्यानुसार महाराष्ट्रात करोनाच्या ( Corona ) संभाव्य तिसऱ्या लाटेत ६० लाख रुग्णसंख्या होण्याची शक्यता आहे. नीती आयोगानेही तिसऱ्या लाटेचा इशारा दिला असतानाही सत्तेच्या हव्यासापोटी आंधळा झालेला महाराष्ट्रातील भाजप ( Maharashtra- BJP ) पुन्हा मंदिरांचे ( Temples ) राजकारण करत आहे, असा आरोप प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत ( Congress spokesperson Sachin Sawant's allegation )यांनी शनिवारी केली.

नीती आयोग अनीतीमान शंखासूर भाजपला समज कधी देणार ? असा सवाल करतानाच सावंत यांनी स्वार्थी राजकारणासाठी जनतेचा जीव धोक्यात घालणाऱ्या भाजपच्या सुपरस्प्रेडर नेत्यांनी ऐकले नाही आणि नियमांचे उल्लंघन केले तर पोलिसांनी कुठलीही दया न दाखवता मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी केली आहे.

राज्यातील मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी भाजप शंखनाद आंदोलन ( BJP's conch blowing agitation ) करणार आहे. या आंदोलनाचा सावंत यांनी समाचार घेतला. कालच केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्रात उत्सवावर निर्बंध घालावेत, असा निर्देश दिला आहेत. तर आज केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनीही करोनाचा प्रभाव रोखण्यासाठी कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.

करोनासंदर्भात केंद्र सरकारने घातलेले निर्बंधही ३० सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आले आहेत. केंद्रातील मोदी सरकार राज्य सरकारांना करोना वाढणार नाही यासाठी कडक उपाययोजना करण्यासाठी उत्सवांवर निर्बंध घाला असे सांगत असताना त्यांच्याच पक्षाचे राज्यातील नेते मात्र गर्दी जमवणारे उत्सव, दहिहंडी, मंदिरे उघडा यासाठी महाराष्ट्रात आंदोलनाची भाषा करत आहेत. ‘जब तक दवाई नही, तब तक ढिलाई नही’, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनालाही राज्यातील भाजपा नेते हरताळ फासत आहेत, अशी टीका सावंत यांनी केली आहे.

करोनाचा धोका अद्याप टळलेला नसतानाही जनआशिर्वाद यात्रेच्या माध्यमातून गर्दी जमवली जात आहे. या यात्रेदरम्यान करोना नियमांच्या उल्लंघनाबाबत गुन्हे दाखल होऊनही भाजपचे डोके ठिकाणावर आलेले नाही. दुसऱ्या लाटेचा प्रभाव वाढण्यासाठी भाजपाचे पश्चिम बंगालमधील सत्तेचे राजकारण कारणीभूत ठरले. आता तिसरी लाट लवकर आणण्यासाठी मंदिरे उघडणे आणि दहिहंडी आयोजनाचा हट्ट करत आहेत, असेही सचिन सावंत म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com