एसटी कर्मचार्‍यांच्या वेतन प्रश्नावर तोडगा काढावा

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
एसटी कर्मचार्‍यांच्या वेतन प्रश्नावर तोडगा काढावा

मुंबई। प्रतिनिधी Mumbai

अनियमित वेतनामुळे ( irregular salary ) एसटीचे कर्मचारी ( MSRTC Employees ) आणि त्यांचे कुटुंबिय प्रचंड आर्थिक तसेच मानसिक तणावात असून स्वत: मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नात लक्ष घालून कर्मचार्‍यांच्या वेतनाच्या प्रश्नात तोडगा काढावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Leader of Opposition Devendra Fadnavis )यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) यांना पत्र पाठवून केली आहे.

एसटी महामंडळातील कर्मचार्‍यांना नियमित वेतन मिळत नसल्याने अनेक कुटुंब प्रचंड आर्थिक संकटात आहेत. कुटुंबाचे अर्थचक्र संकटात सापडल्याने नाईलाजाने एसटी कर्मचार्‍यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलणे सुरू केले आहे.

अहमदपूर, तेल्हारा, शहादा, कंधार आणि साक्री अशा अनेक ठिकाणी एसटी कर्मचार्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. यापूर्वी गेल्यावर्षी जळगाव येथे वाहक मनोज चौधरी आणि रत्नागिरी येथे पांडुरंग गडदे या एसटी कर्मचार्‍यांच्या आत्महत्या झाल्यानंतर आपल्याशी पत्रव्यवहार केला होता, याची आठवण फडणवीस यांनी करून दिली आहे.

नाशिक आणि इतरही भागात त्यानंतर आत्महत्यांचे सत्र सुरूच राहिले. धुळे जिल्ह्यातील साक्री येथे बेडसे या एसटी कर्मचार्‍याने आत्महत्या करताना लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत वेतन मिळत नसल्याने आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. असे असताना परिस्थिती नीट न हाताळता संताप व्यक्त करणार्‍या त्यांच्या संतप्त नातेवाईकांविरूद्धच पोलिसांनी गुन्हे दाखल केले. या घटनेने राज्यभरात एसटी कर्मचार्‍यांमध्ये संतापाचे वातावरण आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

एसटी कर्मचार्‍यांच्या या व्यथांकडे तातडीने हस्तक्षेप करीत आपण लक्ष द्यावे आणि राज्यभरातील या कर्मचार्‍यांना दिलासा द्यावा. केवळ कर्मचारीच नाहीत, तर त्यांचे कुटुंबिय सुद्धा प्रचंड मानसिक आणि आर्थिक तणावाखाली आहेत. त्यामुळे आपल्या स्तरावर या गंभीर प्रश्नाची तत्काळ सोडवणूक करावी, असेही फडणवीस यांनी पत्रात नमूद केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com